पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या संख्येने आज एक हजाराची संख्या ओलांडली. आज सकाळच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने बाधितांची संख्या 1013 वर पोहोचली आहे. तर आज (गुरुवारी) दुपारी साडेबारावाजेपर्यंत तब्बल 81 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शहरातील रहिवाशी असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पहिला रुग्ण 12 मार्च रोजी आढळून आला होता. तर अवघ्या तीन दिवसांत हा आकडा 12 जणांवर पोहोचला होता. यानंतर मात्र तब्बल 14 दिवस शहरात एकही रुग्ण न आढळल्याने शहर करोनामुक्तीचे दिशेने निघाले होते. त्यातच दिल्ली येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या काही व्यक्तींना बाधा झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. यावर नियंत्रण येण्यापूर्वीच 19 मे पासून शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आल्याने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने बाधितांचा आकडा झपाटल्याने वाढला.
बुधवारी 272 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी काही जणांचे अहवाल सकाळच्या टप्प्यात महापालिकेला प्राप्त झाले. या अहवालानुसार तब्बल 81 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान दोन करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे दोघेही शहरातील रहिवाशी असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठ ते दहा दिवसांत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने शहरावर पुन्हा करोनाची दहशत निर्माण झाली आहे.