नवी दिल्ली -महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी 90 हजारांचा टप्पा ओलांडला. तर देशात सलग सातव्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडली.
महाराष्ट्रात एका दिवसात आणखी 2 हजार 259 नवे करोनाबाधित आढळले. एकट्या मुंबईत 50 हजारांहून अधिक करोनाबाधित आहेत. देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.
सोमवार सकाळपासून 24 तासांत देशभरात नवे 9 हजार 987 करोनाबाधित आढळले. एकाच दिवसातील तो नवा उच्चांक ठरला. जून महिन्यातील प्रत्येक दिवशी देशात करोना संसर्गाने 200 हून अधिक बाधितांचा बळी घेतला.
करोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडूचा दुसरा क्रमांक लागला आहे. त्या राज्यातील बाधितांची संख्या 35 हजारांच्या घरात पोहचली आहे. दिल्लीत सुमारे 30 हजार तर गुजरातमध्ये 21 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 11 हजारांहून अधिक रूग्णांना करोनाची लागण झाली आहे.
करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. त्या राज्यात आतापर्यंत 1 हजार 313 बाधित दगावले आहेत. दिल्लीतील मृतांची संख्या 900 च्या घरात पोहचली आहे. मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये करोनाने 400 हून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.
करोना संकटाच्या काळात बाधित बरे होण्याचे प्रमाण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. ते प्रमाण 48.47 टक्के इतके आहे. देशातील सक्रिय बाधित आणि करोनामुक्त झालेले बाधित यांची संख्या एकमेकांजवळ येऊन ठेपली आहे.