नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या अवताराने भारतात बाधित झालेल्यांची संख्या 114 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संबंधित माहिती देताना नवकरोना अवतरल्यानंतर स्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले.
भारतातही नवकरोनाचे बाधित आढळल्यानंतर केंद्राकडून राज्यांना सातत्याने आवश्यक त्या दक्षतेसाठी सल्ला दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळला. त्यानंतर त्या देशातील करोना संकट अधिकच गहिरे बनले आहे.
त्यामुळे भारतात सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे. इतर अनेक देशांतही ब्रिटिश करोनाचे अस्तित्व आढळले आहे. त्यामध्ये जपान, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड, लेबनॉन आणि सिंगापूरचा समावेश आहे.