डॉ. अतुल भोसले यांची समाजबांधवांच्या बैठकीत ग्वाही
कराड – नाभिक समाजाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.पन्हाळगडावर जिवाजी महाले यांनी आपल्या राजासाठी जिवाची पर्वा न करता बलिदान दिले. स्वामीनिष्ठ जिवाजी महाले यांचा पराक्रम महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. शहरातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कराड शहर नाभिक समाज मंडळाच्या वतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नाभिक समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष मनोज वास्के, नगरसेविका निर्मला काशिद, नगरसेवक बाळासाहेब यादव, शहराध्यक्ष संभाजी काशिद, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, भीमराव वास्के, रमेश वास्के, निवास जाधव, सदाशिव सपकाळ, दिलीप क्षीरसागर, भानुदास वास्के, अतिष ठोंबरे, मनोज पवार उपस्थित होते.
ते म्हणाले, शहरामध्ये संत सेना महाराजांचे मंदीर उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा तसेच नाभिक समाजातील तरुणांसाठी शासनाच्या विविध योजनेमधून अर्थसहाय्य करुन त्यांना स्वावलंबी बनवणार आहे. विठ्ठल भक्त संतसेना महाराजांच्या मंदिराचा प्रश्न सोडवण्याचे भाग्य मला मिळावे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
तसेच कराड दक्षिणमध्ये औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी सर्व समाजाने ठामपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विनोद वास्के, नीलेश झेंडे, भाऊ दळवी, विनय सपकाळ, चंद्रकांत जगताप, निवास मसूरकर, संतोष साळुंखे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.