कोल्हापूर – कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोक्का गुन्ह्यासह विविध गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी विशाल प्रकाश वडरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांनी आरोपी विशाल प्रकाश वडर याला अटक केली आहे. ही कारवाई पुलाची शिरोली गावाच्या हद्दीतील पीर वाले साहेब बाबा दर्गा येथे करण्यात आली.
दरम्यान, आरोपी विशाल वडर याच्यावरती राजारामपुरी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत वडर हा फरारी असल्याने त्याचा शोध घेतला जात होता. अखेर आज, सोमवारी तो स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील रामचंद्र कोळी, आसिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव यांनी केली आहे.