यंदाच्या दिवाळीत फटाक्‍यांचा “आवाज’ घसरला…

जनजागृती आणि पावसाच्या मुक्‍कामाने धुमधडाका थांबविला


पिंपरी, चिंचवडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनि प्रदूषण घटले

पिंपरी – दरवर्षी दिवाळीत फटाक्‍यांचा आवाजाचा आलेख वाढतच होता. परंतु यावर्षी जनजागृती आणि मुक्‍काम ठोकून बसलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्‍यांचा आवाज घसरला असल्याचे दिसून आले आहे.
फटाक्‍यांचा आवाज आणि यंदा फटाक्‍यांच्या विक्रीत झालेली घट पाहता यंदा ध्वनि प्रदूषण कमी होण्याचा अंदाज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्‍त केला होता.

त्यासोबतच शाळांमधून करण्यात आलेले प्रबोधन देखील उपयोगी झाल्याचे दिसत आहे. सर्वांत मोठी भूमिका निभावली ती म्हणजे पावसाने. पावसाने फटाके फुटूच न दिल्याने ध्वनि आणि वायू प्रदूषण कमी झाल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केला आहे. दिवाळीपूर्वी साधारण महिनाभर अगोदरच दुकाने थाटलेली असतात. दरवर्षी फटाके उडविण्यासाठी एकच स्पर्धा असते. बालचमूपासून मोठयापर्यंत सर्वजणच फटाके वाजवतात. मात्र, गेल्या वर्षीपासून शासनाने मोठे फटाके, आवाज करणारे फटाके आणि प्रदूषण होणाऱ्या फटाकांवर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. तसेच अग्निशमन विभाग, पोलिस आणि महापालिका अतिक्रमणामुळे अवैध दुकानांना आळा बसला आहे.

असे घसरले आकडे
गत वर्षी लक्ष्मीपूजनादिवशी चिंचवडमध्ये रात्रीची 66.7 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. ती यंदा घसरून 63.8 डेसिबलपर्यंत खाली आली आहे.. पिंपरीत गेल्या वर्षीची 62 डेसिबस आवाज होता तो यंदा 60 डेसिबलपर्यंत खाली घसरला. एकुणच पिंपरी, थेरगाव आणि चिंचवडमधील स्थितीत रात्रीचा आवाज कमी झाल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. पाडव्याच्या रात्री देखील अचानकच कोसळलेल्या पावसांच्या सरींनी फटाक्‍यांच्या उत्साहावर “पाणी’ फेरले.

रात्रीच्या तुलनेत दिवसा आवाज अधिक
प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी पिंपरीतील डिलक्‍स चौक, चिंचवड येथील चापेकर चौक आणि थेरगाव येथील डांगे चौकातील प्रमुख चौकात तपासणी केली. दिवाळीत रात्री आवाज वाढतो, परंतु यंदा रात्रीपेक्षा दिवसा आवाजाची पातळी वाढली होती. मात्र, ती 80 डेसिबलच्या आत होती. डांगे चौकात दिवसा सर्वाधिक उच्चांक 81 डेसिबल इतका होता. मात्र, हा आवाज केवळ एका तासापुरता होता. तर, रविवारी लक्ष्मीपूजन दिवशी रात्री सात ते दहा या वेळेत पातळी सर्वाधिक 71 डेसिबल आणि सर्वात कमी 42 डेसिबल नोंदवली गेली आहे. चिंचवडच्या चापेकर चौकात सर्वात कमी आवाजाची नोंद झाल्याची माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. गत वर्षीपेक्षा 3 डेसिबलने आवाजाची तीव्रता कमी नोंदली गेली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)