यांउंदे (कॅमेरून) – कॅमेरूनमध्ये एका फुटबॉल सामन्याच्यावेळी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 38 जणांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिकन चषक नॅशनल फुटबॉल स्पर्धेच्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेच्यावेळी 7 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चेंगराचेंगरीमधील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयात पोहोचवले. पण जखमींची संख्या खूप जास्त असल्यामुळे रुग्णालयामध्ये त्वरित उपचार केले जाऊ शकत नसल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जखमींना 4 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही दुर्घटना कॅमेरूनची राजधानी यांउंदेतील ओलेंबे स्टेडियमबाहेर घडली. फुटबॉलचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांनी कुलूप लावून बंद केले असल्यामुळे तेथून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येत नव्हता. हे कुलूप उघडताच प्रचंड गर्दी आत घुसल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये लहान मुलेही होती, त्यातच खाली पडलेल्यांपैकी अनेकांना मागून आलेल्या गर्दीने पायदळी तुडवले. त्यांच्यावर उपचारांसाठी त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकली नाही, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले.
कॅमेरूनचे अध्यक्ष पॉल बिया यांनी या दुर्घटनेच्या कारणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकच दिवस आगोदर राजधानी याऊंदेतील एका नाईटक्लबमध्ये आग लागल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता. या आगीमुळे नाईटक्लबमध्ये अनेक स्फोट देखील झाले होते.