नवी दिल्ली – कॉंग्रेसने तयार केलेल्या कथित टूलकिट प्रकरणाच्या तपासाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. कॉंग्रेसने तयार केलेल्या या टूलकिट प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या माध्यमातून चौकशी करावी.
या टूलकिटच्या माध्यमातून एनडीए सरकारविरोधात तसेच करोनाशी लढा देणाऱ्या देशाच्याविरोधात मोहीम राबवण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. पण ही याचिका न्यायायलयाने फेटाळून लावली आहे.
भारत हा लोकशाही देश असल्यामुळे जर तुम्हाला टूलकिट आवडले नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला. हा सर्वकाही राजकीय प्रचाराचा भाग असतो. आवडले नाही तर दुर्लक्ष करा, असे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले.
ही सुनावणी न्या एम. आर. शाह यांच्यासोबत न्या चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठाने केली. संविधानातील कलम 32 अंतर्गत वकील शशांक शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली होती. या टूलकिटमध्ये धार्मिक हेतूने प्रेरित साहित्य होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता.