मुंबई – मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पूरस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगाणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवसांनंतर आठवड्याच्या शेवटी पश्चिम किनाऱ्यावर विशेषतः मुंबई, कोकण, गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या आठवड्यात सातारा, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.