बूट फेकल्या प्रकरणातील इतर फरारी आरोपींना अटक करण्याची मागणी
नगर – महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांना शिवीगाळ व दमदाटी करत अधिकाऱ्यांवर बूट फेकल्याप्रकरणी आरोपी नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जोपर्यंत पाठवला जात नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा मनपा कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवल्याने मनपाचे कामकाज ठप्प झाले होते.
महापालिका अधिकाऱ्यांवर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात जे नगरसेवक आरोपी आहेत, त्या नगरसेवकांना अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी कामगार युनियनने आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत तसा प्रस्ताव पाठवला जात नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, सलग शनिवार-रविवारच्या आलेल्या सुट्ट्या व त्यानंतर दोन दिवस कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन यामुळे गेल्या चार दिवसांपासून महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
बूट फेकल्याच्या प्रकरणातील इतर फरारी आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणीही कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड, नगरसेवक नज्जू पैलवान, नगरसेविका कमल सप्रे, नगरसेविका रिटा भाकरे, शैलेश भाकरे, दत्ता सप्रे, गिरीश जाधव, विशाल वाडकर आदी आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.