मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 101 टक्के महाविकास आघाडीचा आणि तोही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर 50 खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
तसेच, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत. त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल. त्यातही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगले काम करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, मला 100 टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ज्यामुळे त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आले आहे.