फेडररबाबतचे वृत्त ठरले एप्रिल फूल

बेर्न – जागतिक टेनिसचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याचा जन्मदिन देशात राष्ट्रीय दिन म्हणून यापुढे साजरा केला जाणार असल्याचे स्वित्झर्लंड सरकारने केलेले ट्‌विट एप्रिल फूल ठरले. खुद्द सरकारकडूनच हे जाहीर करण्यात आले. मात्र, फेडररला देशाच्या पर्यटन मंत्रालयाने ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर म्हणून नियुक्त केल्यामुळे तसा एकप्रकारे फेडररचा सन्मानच झाला आहे.

स्वित्झर्लंडच्या या महान टेनिसपटूने आपल्या देशाचे नाव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याच्या या योगदानाचा सन्मान म्हणून स्वित्झर्लंड सरकार फेडररचा जन्मदिन म्हणजेच 8 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा केवळ एक एप्रिल फूलचा विनोद असल्याचे सरकारनेच जाहीर केल्याने जागतिक क्रीडा क्षेत्रात सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

खरेतर 1 ऑगस्ट हा दिवस स्वित्झर्लंडचा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, आता फेडररचा जन्मदिन राष्ट्रीय दिन घोषित केला जाणार असे वर्तवल्याने खुद्द फेडररलाही आश्‍चर्य वाटले होते. मात्र, हा एप्रिल फूलचा संदेश असल्याचे स्पष्ट झाल्यावर फेडररनेही समाधान व्यक्‍त केले आहे. पारंपरिक पद्धतीने आता 1 ऑगस्ट हाच दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा होत राहील याचेच मला जास्त समाधान वाटते, असे फेडररने म्हटले आहे.

स्वित्झर्लंडने फेडररच्या सन्मानार्थ 20 फ्रॅंकचे चांदीचे नाणे प्रदर्शित केले होते. इतकेच नव्हे तर, फेडररला स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने काही वर्षांपूर्वीच ब्रॅंड ऍम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्तीही कायम ठेवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.