नव्या नियमांमुळे आरोपी ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी

पिंपरी – आरोपीला अटक केल्यानंतर त्यास सुरवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली जाते. न्यायालयीन कोठडीत आरोपीला तुरुंगात पाठविले जाते. मात्र आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय आरोपीला तुरुंगात घेऊ नये, असा आदेश महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांनी काढला आहे. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने आरोपीला ठेवायचे तरी कुठे? असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

चोरीच्या किंवा गंभीर स्वरूपाच्या मारहाणीत पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्यास जास्तीत जास्त दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळते. त्यातही न्यायालयात हजर करताना आरोपीची करोना चाचणी करण्यास सांगितले जाते. यामुळे पोलीस ऍन्टिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करतात. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. तर दुसरीकडे आरोपीला दोनच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यास तिसऱ्या दिवशी चाचणीशिवाय कारागृहात घेत नसल्याने या आरोपीला ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही पोलीस अधिकारी आरोपी आजारी असल्याचे दाखवून त्यास एक दिवस रुग्णालयात ठेवतात. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्‍ती केली जाते. रुग्णालयात आरोपीला बेड्या घालून ठेवता येत नाही. तसेच आरोपीचा अहवाल न आल्यामुळे त्यास कोविड किंवा नॉन कोविड रुग्णालयात दाखल करावे, असा प्रश्‍नही निर्माण होतो. मात्र पुरेशा सुरक्षे अभावी आरोपी रुग्णालयातून पळून जाण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे आरोपीच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत पोलिसांना डोळ्यात तेल घालून आरोपीवर नजर ठेवावी लागते.

तसेच आरोपी करोना बाधित आल्यावर त्यास कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. अशावेळी संपर्कात आलेले पोलीसही बाधित होण्याची शक्‍यता असते. आरोपीमुळे पोलीस आणि पोलिसामुळे आरोपी करोना बाधित झाल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. या नवीन नियमांमुळे आरोपी पोलिसांसमोर डोकेदुखी ठरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.