सामाजिक बांधिलकी जपत तब्बल साडेचार लाख रुपयांची आर्थिक मदत
– व्यंकटेश भोळा
पुणे -अभियांत्रिकी शिक्षणात नावलौकिक असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात “सीओईपी’तील प्राध्यापक यशवंत कोळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल साडेचार लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वेतनास दिरंगाई झाल्यास आकाडतांडव करणारे प्राध्यापक दिसतात. मात्र, ग्रामीण भागातून संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण घेत प्राध्यापक झालेले कोळेकरांनी ऐन करोनाकाळात राज्य सरकारला मदतीचा धनादेश देत नवा आदर्श शिक्षणक्षेत्रापुढे ठेवला आहे.
मूळचे तुळजापूरचे असलेले कोळेकर हे गेल्या 29 वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागात वेगवेगळ्या तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.
शिक्षण मिळाले तर कुटुंब, गाव, देशाचा विकास होऊ शकतो. याच भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प कोळेकर यांनी सोडला. पैशाअभावी काही विद्यार्थी शिक्षण सोडून देत असल्याचे निदर्शनास आले. त्याच अनुभवातून गेल्या पाच-सहा वर्षांपासून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करीत असल्याची भावना प्रा. यशवंत कोळेकर यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
मुलानेही शिकवणीतून वाचलेला खर्च गरजूंना दिला…
वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुलगा जयंवत कोळेकर यानेही गरीब मुलांना मदत करण्याचा निश्चय केला. सध्या औंध येथील केंद्रीय विद्यालयात दहावीत शिकत असलेला जयवंतने वर्षभरात कोणतेही क्लास लावले नाही. क्लासचे जी रक्कम जमा राहिली, असे जवळपास 50 हजार रुपये त्यांनी वडिलांकडे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना व्यक्त केली. त्यानुसार 25 हजार रुपये ओरिसा येथील कलिंगा इन्स्टिट्यूटमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिले. तर 25 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले.
वेबिनारचे नोंदणी शुल्क थेट मुख्यमंत्री सहायता निधीत
राज्यातील करोना लढ्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व व्यावसायिकांसाठी प्रा. यशवंत कोळेकर यांनी विभागामार्फत 8 दिवसांचे ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. त्यासाठी अमेरिकेतून 8 आणि देशभरातून 16 तज्ज्ञांनी व्याख्यान दिले आहे. या वेबिनारसाठी नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये, तर अन्य घटकांसाठी 800 रुपये निश्चित केले होते. सहभागी होणाऱ्या सर्वांनाच नोंदणी शुल्क थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे सूचित केले. सर्व शिखर संस्थांच्या परवानगीने नोंदणी शुल्क निधीत जमा झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कोळेकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी केले कार्याचे कौतुक
करोना लढ्यात राज्य सरकारला आर्थिक साहाय्य करण्याचे यापूर्वीच निश्चित केला होते. कुसुम कोळेकर आणि आप्पाराव कोळेकर या आई-वडिलांच्या वाढदिवस-पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधीत वर्षभरात सव्वातीन लाखांचा निधी ऑनलाइनद्वारे कोळेकर सरांनी दिला आहे. या सामाजिक बांधिलकीची दखल घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोळेकर यांचे आभार मानले. एवढेच नव्हे तर थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना ऐन टाळेबंदीच्या काळात त्यांना 1 लाखांचा धनादेश कोळेकर यांनी दिला.