इस्रायलमध्ये नव्याने निवडणुका होणार

नेत्यान्याहू यांचे सरकार 1 मत कमी पडल्याने कोसळले

जेरुसलेम (इस्रायल) – इस्रायलच्या राजकारणामध्ये गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. संसदेतील खासदारांनी संसद विसर्जित करण्याच्या आणि नव्याने निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. या फेरनिवडणुका 17 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या नियोजित मुदतीपूर्वी पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांना आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे या फेरनिवडणुका घेण्यात येणार आहेत.

सहा आठवड्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत नेत्यान्याहू यांच्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यान्याहू यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे फेरनिवडणुकीच्या प्रस्तावावर झालेल्या मतदानामध्ये प्रस्तावाच्या बाजूने 74 आणि विरोधात 45 खासदारांनी मतदान केले.

नेत्यान्याहू यांना सलग पाचव्यांदा निवडणुकीतील विजय मिळाला होता. मात्र माजी संरक्षण मंत्री अविग्दोर लिबेरमान यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे नेत्यान्याहू यांना येस्राईल बेटनू या अन्य पक्षाकडून अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही. कडव्या ज्यू पक्षांनी आपल्या लष्करी पद्धतीत अपवादाचे बदल करावेत, अशी नेत्यान्याहू यांनी केलेली विनंती या पक्षाकडून अमान्य झाली होती. हा पाठिंबा न मिळाल्याने 120 सदस्यांच्या संसदेमध्ये नेत्यान्याहू यांना केवळ 60 सदस्यांचेच पाठबळ मिळाले. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 61 सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक होता. पण 1 मत कमी पडल्यामुळे त्यांचे सरकार पडले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.