पुणे- अनलॉकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे प्रामुख्याने लघु व मोठ्या उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करावी, असे आदेश ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार गुप्ता यांनी दिले.
पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा तसेच नवीन वीजजोडणीसंदर्भात गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी हे आदेश दिले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, सुनील पावडे यांची उपस्थिती होती.
गुप्ता म्हणाले, सध्या प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानसह इतर क्षेत्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत राहील, याची प्राधान्याने काळजी घ्यावी व त्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून ठेवावी. नवीन वीजजोडण्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतरची प्रक्रिया आणखी वेगवान करावी.