निरीक्षक विजय कुमार चढ्ढा यांच्या सूचना
पुणे –“लोकसभा निवडणुकातील खर्चांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. प्रचारासाठी होणारा निवडणूक खर्च उमेदवारांकडून सादर होतो. मात्र, प्रत्यक्षात होणारा खर्च आणि सादर होणारा खर्च यात तफावत असण्याची शक्यता असते, त्यामुळे भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांनी दक्ष राहून निवडणुकांवर होणारा खर्च लक्षात आणून दिला पाहिजे,’ अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार चढ्ढा यांनी दिल्या.
व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च व्यवस्थापनचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, मिडीया सेंटरच्या नंदिनी आवडे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक तडवी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. चढ्ढा यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व भागाचा दौरा केला. त्यावेळी मावळ, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शांत, निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी काही बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल, मद्य यांचा गेल्या तीन महिन्यातील वापर आणि उलाढालींची माहिती संकलित करावी.
सोशल मीडिया, पेड न्यूजबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच मतदारांना किंवा एकगठ्ठा मतांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना काही उमेदवार टूर पॅकेज देण्याची शक्यता असते, यावरही लक्ष ठेवण्यात यावे. कम्युनिटी सेंटर, बॅंक्वेट हॉल, स्वयंसहायता बचत गट याबाबतही आवश्यक ती माहिती संकलित करण्याचे तसेच ग्रूप एसेमेससाठी टेलिफोन ऑपरेटिंग कंपन्याची बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली.