UPA आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

औरंगाबाद – कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीची आता फेररचना करण्याची गरज असून शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांकडे युपीए आघाडीचे नेतृत्व देण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आता देशात एनडीए आघाडीचे अस्तित्वच उरलेले नाही. भाजप प्रणित आघाडीतून बहुतेक सर्व राजकीय पक्ष बाहेर पडले आहेत. युपीए आघाडी आज अस्तित्वात असली तरी तिचे अस्तित्व जाणवण्या इतके प्रभावी नाही.

येथे आयोजित करण्यात आलेल्या जयभीम फेस्टीव्हल मध्ये राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आज युपीए आघाडीत काही पक्ष उरलेले असले तरी अन्य प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली या आघाडीत काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पवारांसारख्या नेत्यांकडे या आघाडीचे नेतृत्व दिल्यास या आघाडीची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.

अनेक प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील होऊ शकतात आणि त्यातून भाजपला समर्थ पर्याय दिला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने थोडी त्यागाची भूमिका घेतल्यास युपीए आघाडीची पुनर्ररचना होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत आता राजकारणातील वातावरणात बदल होंऊ लागल्याचे जाणवत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आज दिल्ली मुकी आणि बहिरी झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत कोणत्याहीं महत्वाच्या घडामोडी होताना दिसत नाहीत. दिल्लीत आज ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षातील सदस्यांना मोकळेपणी बोलता येत नाही, त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यांना एकमेकांकडे पाहून हसण्याचाहीं अधिकार आता उरलेला नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली.

आपल्याकडे पाहून कोणी हात केला तर ते दृष्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल अशी धास्ती आता लोकांना वाटु लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय स्तरावर राजकारण केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. अनेक प्रादेशिक पक्षांना आणि अन्य पक्षांनाही आता नवीन नेतृत्व हवे आहे. हे नेतृत्व आता महाराष्ट्रच देऊ शकतो असे ते म्हणाले.

डेलकरांच्या चिठ्ठीत भाजपशी संबंधीतांची नावे
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन जी आत्महत्या केली त्या विषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की,डेलकर यांनी जी चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यात भाजपशी संबंधीत लोकांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांना त्यांच्या निवासस्थानीही आत्महत्या करता आली असती पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली आहे. मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्‍वास होता, ते आपल्या मृत्यूची चौकशी करतील अशीच त्यांना अपेक्षा असावी असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.