संस्कारक्षम कुटुंबाच्या नंदादीपाची गरज

समाजाचे सातत्य टिकवण्यासाठी प्रत्येक घटक कधी जाणिवेने तर कधी नेणिवेने कार्यरत असतो. व्यवस्था म्हटले की आपल्याला प्रशासकीय अथवा सामाजिक व्यवस्था आठवतात. व्यवस्थेला सांधून ठेवणारा अथवा टिकवून ठेवणारा मजबूत खांब म्हणजे विविध संस्था होत. या संस्था समाजातील भिन्नत्वाला एक सुंदर एकसंध स्वरूप प्राप्त करून देतात. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांना त्यामध्ये विशिष्ट स्थान आहे. कुटुंबे एकत्र एका ठिकाणी नांदतात, तेंव्हा त्या भूभागाला कधी गल्ली तर कधी कॉलनी संबोधले जाते. त्याचे विस्तृत स्वरूप म्हणजे गाव होय तर गावांचे तालुका हे आणि तिथून पुढे जिल्हा, राज्य अन्‌ देश होय. मात्र मूलभूत घटक हा कुटुंब होय.

मात्र, कुटुंबाची रचना अखेर व्यक्तीसापेक्ष असते. व्यक्तिंचा समूह म्हणजे कुटुंब होय असे ढोबळ मानाने म्हणता येईल. मात्र, त्यांच्यातील अनुबंध हे औपचारिक नसतात. या व्यक्तिंचे व्यक्तिमत्व अर्थातच प्रत्येकाचे भिन्न होय. तरीही ते परस्परपूरक, परस्परविरोधी असतात. हे मात्र नक्की होय. त्यामुळेच किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, अशी अवस्था कुटुंबातील सदस्यांची असते. व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी ही केवळ शारीरिक नाही तर एकंदरीत स्वभावाचा परिपाक असते. ही त्यातील त्यातील दूसरी बाजू होय.

एका ठिकाणी म्हटले आहे मला व्यक्तिमत्व हवे. क्षुद्रपणा नव्हे!’ हे वाक्‍य अथवा हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण व्यक्तिमत्व आणि क्षुद्रपणा यांमधील अंतर दूर करते ते खरे कुटुंब होय. ज्याला कुटुंब नाही त्याचे व्यक्तिमत्व बव्हंशी अपूर्ण राहते. अर्थात दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येईल की कुटुंबाविना व्यक्तिचे व्यक्तिमत्व अपूर्ण राहण्याची शक्‍यता असते. यालाही सन्माननीय असे अपवाद आहेतच ! परंतु सर्वसामान्यपणे व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी सर्वमान्य आधार म्हणजे कुटुंबच होय. माणसामध्ये मूळातच जे अपूर्णत्व असते त्याला काहीतरी टेकू असावा लागतो. मोकळ्या जागा भरणारे पैलू अथवा घटक असावे लागतात. हे पैलू समाजातील घटकांबरोबरच कुटुंबातील सदस्य पूर्ण करतात.

प्रत्येकाचे व्यक्तिमत्व परिपूर्ण होते असे नाही. परंतु व्यक्तिमत्वातले कच्चे दुवे कुटुंबातून सुरूवातीला झाकले जातात. त्यानंतर हे कच्चे दुवे नष्ट करण्याचे प्रयत्न होतात. किमान काही ठिकाणी तसा प्रयत्न तरी होतो. कुटुंब ही सकारात्मकतेची तुळस आहे. घराचे अंगण हे सद्गुणांची, मानवतेची आठवण करून देणारे आभाळ असते. हे तुझेच घर आहे. इथली माणसे तुझी आहेत. जे काही बरे वाईट आहे ते सर्व केवळ तुझेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे आहे. हा विश्वास जागृत करणारे हे अंगण व तुळस असते. विश्वास, सहकार्य, जबाबदारी आणि सुरक्षितता या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे कुटुंब होय.

या सर्वांचा सुरेख पाया म्हणजे परस्परप्रेम होय. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रेम, प्रेम आणि प्रेम जगात सर्वोत्कृष्ट आहे प्रेम. सुरूवात प्रेम आणि शेवटही प्रेमच. कुटुंबातील सर्व सदस्य या प्रेमाने जोडलेले असतात. पूर्वीचे सध्याचे व भावी आयुष्य या कुटुंबाच्या प्रेमाचा ठेवा असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत सर्वच वेगळे असते. मात्र जे वैशिष्टय भारताचे तेच कुटुंबाचे असते. प्रचंड विविधतेमध्ये एकता असते. आजी आजोबा क्वचित पणजोबा, आई वडिल, भाऊ, बहिण अविवाहित असेल तर घरात आत्याचाही सहवास मुलांना लाभतो.

या सर्वांचे अस्तित्व विचारसरणी, संगत, ध्येय सर्वच भिन्न असते. मात्र त्यांना गुंफणारा धागा एकच असतो. तो म्हणजे कुटुंबभावना. समाजातील अनेक बाबी माणसे आणि विचार आपण न आवडल्यामुळे दुर्लक्षितो क्वचित तोडूनही टाकतो कारण ते टिकाऊ नसतात, औपचारिक असतात. मात्र कुटुंब हे जणू नेमून दिलेले प्रेममय जग असते. प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रिणी ही एक निवड असते. ती ऐच्छिक असते. मात्र आई वडिल हे ईश्वराने प्रदान केलेले असतात. आजी आजोबा आपण निवडायचे नसतात. आत्या असते तशीच आपल्याला आवडते. मात्र हे सर्व देवदत्त असले तरी थोपवलेले वाटत नाही, लादलेले वाटत नाही. आजीचा आणि मुलांचा नातेसंबंध पहा ना! अद्भूत असा गोडवा असतो. त्यामध्ये आजी छान दिसते का? आजोबा हॅंण्डसम आहेत का? असले भौतिक प्रश्न तिथे गौण असतात. तिथे फक्त प्रेमानुबंध असतात.

गरम गरम भाजी आणि भाकरी सकाळच्या कोवळ्या उन्हात सारवलेल्या अंगणात आजी जेंव्हा नातवांना भरवते तेंव्हा ते दृश्‍य तो भावानुभव ती अनुभती अद्वितिय असते. तिथे प्रेम, आपुलकी जिव्हाळा यांचा सुरेख असा स्वर्गीय संगम झालेला असतो. आजी जेंव्हा नातवावर जीव लावते तेंव्हा परमेश्वरसुध्दा गालातल्या गालात हसून स्वतःला शाबासकी देत म्हणत असेल किती सुंदर नाते मी निर्माण केले आहे. प्रेम, संस्कार, परंपरा या सर्वांचाच तो एक अद्भूत मिलाफ असतो. परस्पर विश्वास आणि रक्ताचे अनुबंध अमर असतात.

कुटुंबात विश्वास खूपच महत्वाचा ठरतो. आजीचा आजोबांवर विश्वास असतो की, त्यांनी औषधे वेळेवर घ्यावी, आजोबांचा आजीवर विश्वास व अपेक्षा असते की तिने सर्व मुलांना आणि सुनांना समान वागणूक द्यावी व खूप तणतण करू नये. आजी आजोबांचा मुलांवर विश्वास असतो की, त्यांनी आपल्याकडे म्हातारपणी आपल्याकडे लक्ष द्यावे. सुनांच्या म्हणजेच त्यांच्या बायकांच्या आहारी जाऊ नये. आजी आणि आजोबांसाठी नाते हे दुधावरची साय असते.

नातवांनाही विश्वास असतो की, माझे काही चुकले, आज अभ्यास बुडवला तर आईच्या मार खाण्यापासून आजी-आजोबा मला वाचवतील. कमवत्या व जबाबदार मुलांना विश्वास असतो की, माझा नवरा मला न्याय देईल. माझ्यावर जीवापाड प्रेम करील. आई वडिलांचे ऐकून माझ्यावर अन्याय करणार नाही. तर घरातील बेरोजगार तरूणाला विश्वास असतो की, घरातले सगळे मला समजून घेतील. नोकरी मिळवणे अवघड आहे मी प्रयत्न करतोच आहे, असा विचार करून मला पाठिंबा देतील. एकंदरीत काय तर कुटुंब हा विश्वासाचा जणू जाहीरनामा असतो.

सुसंस्कार हा सुध्दा कुटुंबाचा मोठाच सकारात्मक पैलू आहे. विशेषतः आज एकविसाव्या शतकात तरूण तरूणींना विश्वबंधुत्व, प्रेम, दया, आपुलकी, अशा सद्गुणांची, मुल्यांची ओळख करून देणे, जाण करून देणे महत्वाचे आहे. सामाजिक वातावरण दूषित होत असताना कुटुंबाने या तरुणांना समजावून घेणे, समजून सांगणे गरजेचे होत आहे. मोबाईल, टीव्ही, सोशल मिडिया यांची आक्रमण रोखणे, त्यासंदर्भात आपला पाल्य वाहत तर जात नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुटुंब खूप महत्वाचे आहे. आपल्यावर कुटुंबाचे लक्ष आहे. अंकुश आहे. याबाबत पाल्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे. मुला- मुलींचे वैयक्तिक जीवन सुसंस्कारी आणि संयमित ठेवणे गरजेचे तर आहेच; त्यासोबत या मुलामुलींचे भावविश्व खऱ्या अर्थान समृध्द करण्यासाठी त्यांचे सामाजिक भान जागरूक असणे आवश्‍यक आहे. पालकच जर तासन्तास मोबाईलवर गुंग असतील तर पाल्यांना आपण काय बोलणार? कोण काय सांगतेय, कोण काय बोलतेय, याकडे मुलांचे लक्ष नाही. पबजी’सारखे गेम्स मुलांच्या जीवावर उठले आहेत. समाजात मिसळावे, सुख-दुःखे वाटून घ्यावी, समाजातील गरीब गरजू घटकांना सामावून घ्यावे व त्यायोगे आपले भावविश्व अनुभव समृध्द करावे, ही खरे तर सुंदर जीवनाची गुरूकिल्ली आहे.

नुुकतेच माझ्या घरी सुटीसाठी आलेली पाहुण्यांची तीन तरूण मुले दोन दिवसांच्या सहवासात मोबाईलमध्ये गुंग होती. माझ्याशी,माझ्या पत्नीशी संवाद साधायला त्यांना वेळच नव्हता. तुम्ही काय वाचन करता? लेखन कसे करता? करिअरबाबत काय करावे? अशा गोष्टींबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा करावी,असे मला वाटत होते. पण माझी अपेक्षा भाबडी ठरली. सातत्याने मोबाईलशी ती मुले खेळत होती. इतकी की, त्यांच्या शरीराचा एक भाग जणू मोबाईल होता. सोन्यासारखा घास समोर असून खाण्यावर त्यांचे लक्ष नव्हते. मोबाईल पाहून संपले की, टीव्ही असाच त्यांचा दिनक्रम होता. यापैकी एक जण तर नुकताच पासआऊट झालेला इंजिनिअर होता. तो आजारी आहे. विशेष बाब ही की त्याच्या आजाराचे मोबाईलचा अतिवापर हे कारण डॉक्‍टरांनी सांगितले आहे. इतर दोघेजण त्याच्यापेक्षा लहान वयाची होती.

याचा अर्थ त्याने त्या दोघांना समजावून सांगणे गरजेचे होते. ते तर दूरच. तो स्वतःच यंत्रांना शरण गेला होता. एक कुटुंबप्रमुख म्हणून माझी चिंता वेगळीच आहे. माझी इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी. अशा नात्यातील मुलांप्रमाणे त्यांचे पाहून यंत्राच्या आहारी जाणार नाही ना? अशी माझी चिंता आहे. त्या तिघांपैकी एकाच्या वडिलांना तर मी व्हॉटस्ऍपवर कडक भाषेत परिस्थितीची जाणीव करून दिली. अभ्यास, करिअर, सामाजिक भान याबाबत या पिढीला संवेदनशीलताच राहिली नाही! स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई अशा संत, समाजसुधारकबाबतची माहिती या मुलांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांचे विचार, त्यांचे कार्य हा खऱ्या जीवनाचा मुर्तिमंत आरसा असतो.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज अशा महान व्यक्तिंची माहिती सोप्या भाषेत मुलांपर्यंत कुटुंबात पोहचली पाहिजे. केवळ जयंती येते, पुण्यतिथी येते. आपण सुट्टी साजरी करतो त्याबाबतचे गांभीर्य मुलांपर्यंत पोहचत नाही. नुकतीच 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिनाच्या रूपात साजरी झाली. घरात येणाऱ्या वर्तमानपत्रात त्याबाबत छान लेख प्रसिध्द झाले. मात्र याबाबत घरात कुटुंबात चकार चर्चा होत नाही. खरे तर यात काही अवघड नाही. पालकांनी विद्वान असण्याची गरज नाही. केवळ इच्छाशक्ती हवी. आपल्या चौथी-पाचवीतल्या मुलाला घेऊन दुचाकीवरून तुम्ही रस्त्यावरून निघाला आहात. वाटेत एखाद्या महान व्यक्तीचा उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा दिसला तर पाल्याला सांगू शकतात. “अरे, यांनी खूप खूप गरीब मुलांना शिक्षण दिले.’ भले त्या मुलांना सर्व काही समजणार नाही. मात्र, एक आपुलकी, सकारात्मकता व समाजात काही चांगले घडत आहे, याचे भान त्याच्या मनात निर्माण होईल. अशा छोट्या गोष्टी कुटुंबाने करण्यात काहीच हरकत नाही. कुटुंब हा नंदादीप आहे. विश्वास, संस्कार, आपुलकी यांची पेरणी झाली तरच कुटुंबाला अर्थ आहे. सशक्त कुटुंब संस्कारी कुटुंब देश घडविते.

तुळस, उंबरा आणि अंगण
तुळस हे पावित्र्याचे भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रतिक आहे. उंबरा हे मर्यादेचे, संस्काराचे प्रतिबिंब आहे. अंगण ही स्वागताची पहिली पायरी आहे. घराची शोभा आहे. या तिन्हीचे अस्तित्व धूसर होऊ देऊ नये. कुटुंबाचे व पर्यायाने देशाचे महत्व संपत्तीवर नाही तर संस्कारावरून ठरते. देश हे शरीर असेल तर प्रत्येक कुटुंब हा श्वास आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.