संवाद काळाची गरज

माणूस लहान असताना त्याला मोठे व्हावेसे वाटते! मोठे झाले की त्याला वाटते आपण लहानच बरे होतो. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असताना त्याला आपल्या भूमिका बदलणे क्रमप्राप्त असते, तशी ती त्या विशिष्ट वेळेची गरज असते. जगण्याच्या संकल्पना जरी सगळ्यांच्या वेगवेगळ्या असल्या तरी काही बाबींचा सर्वांचा धागा हा सारखाच असतो. फरक तो इतकाच उरतो की, कोणी त्याला जबाबदारी म्हणते तर कोणी कर्तव्य! माणूस वाढत्या वयाबरोबर आपल्या धारणा बदलताना दिसतो. आदर्शवादी जीवनाकडून तो वास्तववादी जगाकडे वाटचाल करतो. हे त्याच्या असण्यासाठी आवश्‍यकच आहे. मात्र, काही व्यक्ती आदर्श वादाकडून अधिक आदर्शवादी होताना दिसतात. यातून मग कुठेतरी त्या व्यक्तीला एकलकोंडेपणाला सामोरे जावे लागते. आणि मग त्या संवादरूपी गाड्याला खीळ बसते.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे माणूस एक यंत्र झाला आहे. यामध्ये समाज माध्यमांचा (Social Media) वाढलेला वापर तर माणसाला माणूस म्हणून जगण्यास अपात्र ठरवीत आहे. या माध्यमाच्या अतिवापरामुळे माणूस स्वत:ची ओळख विसरून जात आहे. उदा. तो निसर्गाच्या सान्निध्यात जात आहे, मात्र, मला इथे माझ्या डीपीसाठी कोणता फोटो चांगला मिळेल यातच तो अधिक समाधानी आहे. यातून तो आपली उत्स्फूर्तता संपवतोय.

हरवलेल्या पाखरांना एकवेळ आपले घरटे मिळेल मात्र, आपण मुळामध्ये हरवलो आहे याची जाणीवच त्यांना नसेल तर ते वापस आपल्या घरट्यामध्ये येण्याचा प्रश्‍नच येत नाही. अशीच काहीतरी अवस्था स्वत:ला प्रगतशील समजणाऱ्या माणसाची झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती वेळेच्या मागे धावताना दिसत आहे. कारण, जगायचे असेल तर आपल्याला धावण्याशिवाय पर्याय नाही, हे त्याच्या मनाने ठरविले आहे. यातून, तो नाती विसरत चालला आहे. आपलेपण संपत आहे. शेवटी, तो एकटाच उरत आहे!

सगळ्यांना बोलायचे आहे, मात्र ऐकायचे कोणालाच नाही. माझेच काय ते खरे, ही वृत्तीदेखील संवादाचा अंत करीत आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे, असे ग्रीक तत्ववेत्ता ऍरिस्टॉटल याने म्हटले आहे. मात्र, सध्या माणूस अधिक समाजशील व्हायचे सोडून तो जास्त आत्मकेंद्रित आणि स्वत: मध्येच गुंतून पडलेला आहे. यातून आपलेपणाची वाट मीपणाच्या मार्गावरून मार्गक्रमण करीत आहे. आत्मिक आणि भौतिकतेच्या स्पर्धेत भौतिकतेचा आज विजय झालेला आपल्याला दिसत आहे. मात्र, तो क्षणिक आहे. सुसह्यतेच्या मार्गावरून चालताना जगणं जगता आले पाहिजे. मात्र, उगीच आपण पळत्याच्या मागे धावून जगण्यातील खऱ्या आनंदाला गमावून बसत आहोत. त्यामुळे जगण्यातील संवादाचा सेतू अत्यंत चांगल्याप्रकारे बांधणे ही आजच्या काळाची गरज आहे.

– श्रीकांत येरूळे

Leave A Reply

Your email address will not be published.