नगर : नगर जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळेच कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले. महसूलमंत्री थोरात यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगर शहर, नगर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. रुग्णांचे घरी विलगीकरण आता सक्तीने बंद करुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे अत्यावश्यक आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल, तर सर्वांनीच प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची गरज आहे. बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी आता शहरी भागात सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण केले जाणे आवश्यक असल्याचे महसूलमंत्री थोरात म्हणाले.
सर्वच कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांनी त्यांची व्यवस्था अधिक चांगली असेल आणि रुग्णांना तेथे अडचणी जाणवणार नाहीत, यासंदर्भात सूचना मागील बैठकीत केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्याबाबत सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या रुग्णवाढीचा वेग पाहता रुग्णांसाठीच्या बेडसची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन आणि कार्यवाही वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मीती प्रकल्प, रेमडेसीवीर तसेच इतर औषधांची उपलब्धता याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीनंतर महसूलमंत्री थोरात यांनी बूथ हॉस्पिटल येथेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत भेट देऊन पाहणी केली.