NDA Government – केंद्रातील एनडीए सरकार अतिशय कमजोर आहे. ते केव्हाही म्हणजे अगदी आगॅस्टमध्येही कोसळू शकते, असे भाकीत राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केले. राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला ७६ वर्षीय लालूंनी आजारी असूनही आवर्जून हजेरी लावली.
त्यांनी काहीशा क्षीण आवाजाने केलेल्या अल्पकाळच्या भाषणातून राजदच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील सरकार कमजोर असल्याने कुठल्याही राजकीय स्थितीला सामोरे जाण्याच्या उद्देशातून कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजदचे संख्याबळ आणि मतांचे प्रमाण वाढले. त्या राजकीय वास्तवातून कार्यकर्त्यांनी बळ प्राप्त करून घ्यावे, असे म्हणत त्यांनी पक्षाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राजद हा बिहार विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष आहे.
इतरांप्रमाणे आपल्या पक्षाने कधीच विचारसरणीशी तडजोड केली नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील ४ जागा यावेळी राजदने जिंकल्या. मागील वेळी तो पक्ष खातेही उघडू शकला नव्हता.