2024च्या लोकसभा निवडणुकीतही ‘एनडीए’ आघाडीच सत्तेवर येईल – पंतप्रधान मोदींचा विश्वास

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीशी आणि इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटेशी केली.
मणिपूर मुद्द्यावरून संसदेत सतत व्यत्यय आणि गदारोळ होत असल्याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या वर्तनावरून असे सूचित होते की त्यांनी विरोधी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे असा टोमणाहीं त्यांनी मारला.
मोदी म्हणाले की, विरोधकांच्या वागणुकीवरून असे दिसते की त्यांनी विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे आणि पुढे जायचे आहे. जगासमोर भारताची प्रतिमा उंचावली आहे आणि भाजप या दिशेने प्रयत्न करत राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखालील सरकार ‘अमृत काल’ 2047 च्या अखेरीस भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनवेल. मोदी म्हणाले की ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना देखील एका परदेशी व्यक्तीने केली होती. ते म्हणाले की इंडियन मुजाहिदीन आणि पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) मध्ये देखील इंडिया हा शब्द आहे. त्यामुळे त्यांच्या आघाडीच्या नावात जो इंडिया शब्द आहे, त्यातून लोकांची दिशाभुल करण्याचा कितीही प्रयत्न त्यांनी केला तरी त्यात त्यांना यश येणार नाही.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही एनडीए आघाडीच सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या सरकारच्या पुढील काळात भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनेल आणि देश अधिक सशक्त बनेल असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानांनी केलेल्या या भाषणाची माहिती भाजपच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांना दिली.





