राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार; शरद पवारांचा विश्वास

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार आहे. परंतु,राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार असून माझ्याकडे आत्ताच तीन अर्ज आले आहेत. बांधिलकी मानणारे माझ्यासमवेत पुष्कळ सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला धोका नाही. शिवेंद्रसिंहराजे मला भेटले होते. भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असं आमचं ठरलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांचे काही स्थानिक प्रश्न होते. खासदारांसमवेत बैठक लावली जावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र उदयनराजे दिल्लीत असल्याने उपलब्ध झाले नाही, असे त्यांनी सांगितले. साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्यानं चिंता करण्याची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.