मुंबई – राज्यात भाजपला एकाकी पाडत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. सरकार स्थापनेला आता जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी अजूनही संपलेली नाही. वेळोवेळी निधीवरून तर कधी महामंडळाच्या वाटपावरून नाराजी बाहेर आली आहे . मात्र आता थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे मोठे वक्तव्य केले आहे. त्यावरून कॉंग्रेसची खदखद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
नाना पटोले यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,’मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!’ असं म्हणत पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपद निवडणुकीत नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केल. सध्या या ट्विटवरून राजकरण चांगलेच तापले आहे. नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून काय प्रतिउत्तर येते याकडे लक्ष लागले आहे.
नाना पटोले यांचे ट्विट
मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!#Gondia #Bhandara #Congress #Election #ZillaParishadElections
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 11, 2022