येत्या दोन ते तीन दिवसांत घरी सोडणार
पुढील 14 दिवस घरीच थांबावे लागणार
पुणे – शहरात सर्व प्रथम आढळलेल्या रुग्णांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत असून, येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांना घरी सोडले जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. ही बातमी आनंदाची असून, करोना बाधित रुग्ण बरा होतो हे यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, खबरदारी बाळगली तर हा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
दरम्यान, या रुग्णांना घरी सोडल्यानंतरही पुढील 14 दिवस त्यांना घरीच थांबायचे आहे. त्यांनी कोणालाही भेटायचे नाही, घराबाहेर पडायचे नाही, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर 40 जणांचा ग्रुप दुबई येथे सहलीसाठी गेला.
1 मार्चला तो मुंबई विमानतळावर उतरला. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, धुळे यासह अन्य जिल्ह्यांतील हे प्रवासी होते. त्यामध्ये सिंहगड रोड परिसरात राहणारे एक दाम्पत्य मुंबई विमानतळाहून कॅब करून पुण्यात आले. चार ते पाच दिवसांनी त्यांना ताप आणि घसा दुखणे अशी लक्षणे दिसून आल्यामुळे नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून तपासणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ त्यांच्या सर्व कुटुंबाची तपासणी केली असता, पत्नी आणि मुलीलाही विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हे दाम्पत्य मुंबईहून कसे आले, पुण्यात कुठे-कुठे गेले याची सर्व माहिती काढून, ज्या कॅबने ते पुण्यात आले, त्या कॅब चालकांची तपासणी केली असता, त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. अशा पद्धतीने पुणे शहरात आतापर्यंत 9 तर, पिंपरी-चिंचवडमध्ये 12 असे एकूण 21 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, या दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅबचालक तसेच अन्य एका बाधित व्यक्तीचे 14 दिवस पूर्ण होत आहे. या पाचही जणांची प्रकृती व्यवस्थित असून, त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, या सगळ्यांनी अजून पुढील 14 दिवस स्वत:ला घरामध्ये कॉरंटाईन करून घ्यायचे आहे.