Ganeshotsav 2021 : महागणपतीचे स्वरूप

त्रिपुरासुराशी झालेल्या युद्धारंभी श्री शंकरांना श्री गणपतीने आपल्या सहस्रनामांचा उपदेश केला होता. त्या नामांचा अर्थ समजून घेऊन महागणपतीच्या स्वरूपाचे ध्यान केले तर आपल्या शरीरातील मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता असलेल्या गणपतीचे दर्शन होते. यासाठी ऋषीमुनींनी आणि संत सज्जनांनी सांगितलेले महागणपतीच्या नामांचे सकलार्थ समजून घेऊयात.

सूक्ष्माहूनी सूक्ष्म सान। त्यामाजी तुझे अधिष्ठान। यालागी मूषकवाहन। नामाभिधान तुज साजे।।
अर्थात सूक्ष्म व अतिसूक्ष्म वस्तूतही गणपतीचे अधिष्ठान आहे. म्हणून त्याला मूषकवाहन असे संबोधले आहे. गणपतीच्या लंबोदर नामाचा अर्थ श्री एकनाथांनी स्पष्ट केला आहे.
तुजमाजी वासु चराचरा। म्हणोनी म्हणिजे लंबोदरा।
या लागी सकळांचा सोयरा। साचोकारा तू होसी।

म्हणजेच चराचर विश्‍व तुझ्यामध्ये सामावले आहे. म्हणून तुला लंबोदर म्हणतात व त्यामुळे तू सर्वांचा सोयरा आहेस. गणपती केवळ शिवपुत्र नसून तो शिवगणांचा अधिपतीदेखील आहे. म्हणूनच त्याला गणनाथ म्हणतात. सर्व गणांचा पती तो गणपती व सर्व गणांचा ईश्‍वर तो गणेश होय. सत्व, रज, तम या तीन गुणांचा जो अधिपती, तो गुणेश म्हणजेच गणेश होय. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाला विद्या गणपती म्हणतात. आत्म स्वरूपाचे ज्ञान नसलेले जीव वेगवेगळ्या इच्छा व वासनांमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यांमध्ये गुंतून पडतात. जिवावर ओढवणारे हे सर्वांत मोठे विघ्न होय. या विघ्नांचे निवारण गणपती आपल्या भक्‍ताला विवेकबुद्धी देऊन करतो. या अर्थाने तो विघ्नहर्ता किंवा दुःखहर्ता आहे.

किंबहुना सोये। जीव आत्म्याची लाहे। तेथ जे होये। तया नाम सुख।।
अशी सुखाची व्याख्या श्री ज्ञानदेवांनी केली आहे. त्यास आत्मसुख म्हणतात आणि तेच खरे अविनाशी सुख असते, श्री गणेश अशा अर्थाने सुखकर्ता आहेत.

पाहता नरू ना कुंजरू।
व्यक्‍ताव्यक्‍तासी परू।
ऐसा जाणोनी निर्विकारू।
नमनादरू ग्रंथार्थी।

असे भागवत ग्रंथारंभी संत एकनाथ श्री गणपतीला म्हणतात. तुझ्या सद्गरूपाचे दर्शन झाल्यावर तू जसा मानव नाहीस, तसाच गजही नाहीस, व्यक्‍त आणि अव्यक्‍त ही नाही, तर त्याही पलीकडचा असा तू निर्विकार आहेस. म्हणून मी तुला आदरपूर्वक नमस्कार करतो. असा या ओवीचा भावार्थ आहे. देवतांच्या कार्यसिद्धीसाठी गणपतीने नरदेह आणि गजमुख असे रूप धारण केले. म्हणून तो गजानन होय.

गज या शब्दाचे दोन अर्थ आहेत. “ग’चा अर्थ ओंकार आहे. आणि “ज’ म्हणजे जन्मणारा. ओंकार स्वरूपातून जो सर्व सृष्टीची निर्मिती करतो त्यास गजानन म्हणतात. विनायक नामाचा विशिष्ट नायक तसेच विशिष्ट शासन करणारा असा अर्थ आहे. इहलौकिक व पारलौकिक विघ्नांचा गणपती नाश करतो म्हणून तो विघ्ननाशी होय.

महागणपतीचे असे विविधांगी स्वरूप जाणून तसेच या विविध रूपातील गणेशतत्त्व एकच आहे. हे समजून घेऊन केलेली भक्ती आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत मोलाची आहे. जे गणेशभक्‍त निष्काम भक्‍ती करतात, त्यांना श्री गणेश भवसंकटातून म्हणजेच जन्म मरणजन्य दुःखातून मुक्‍त करतात. तसेच आपल्या व त्यांच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान देतात असा श्री गणेशाचा महिमा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.