नवी दिल्ली: विमानातून बॉम्बद्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी आज डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे एसयु-30 एमकेएल या विमानातून 500 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला. पूर्वनियंत्रित प्रणालीतून या बॉम्बने लक्ष्याचा अचूक वेध घेतला, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. हा लक्ष्य भेद करण्यासाठी बॉम्बने अपेक्षित पल्ला आणि वेग अगदी अचूक गाठला होता, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाने सुपरसोनिक ब्रम्होस क्रूझ क्षेपणास्त्र सुखोई विमानातून जमिनीवरील लक्ष्यावर सोडण्याची चाचणी दोनच दिवसांपूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर घेतली होती. त्या चाचणीमध्ये 2.5 टन वजनाच्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना 300 किलोमीटर दूरवरच्य लक्ष्यावर अचूकपणे सोडता येणार आहे. ब्रम्होस क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा किमान तिप्पट म्हणजे 2.8 मॅक वेगाने मारा करू शकते. त्या यशस्वी चाचणीनंतर लगेचच ही दुसरी चाचणीही यशस्वीपणे घेण्यात आली आहे.