टाकवे बुद्रुक – राज्यात अनेक ठिकाणी समाजसुधारक सामाजिक संघटना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करीत आहेत. तर दुसरीकडे झाडावर व्यक्तींची नावे लिंबावर लिहून खिळा लावून झाडाला लटकवला. हा धक्कादायक प्रकार आंदर मावळातील टाकवे गावाजवळील इंद्रायणी नदीजवळील भैरवनाथ मंदिराच्या ठिकाणी घडला. सोमवारी (दि. 9) ही बाब निदर्शनास आली.
या प्रकरणी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य अविनाश मारुती असवले यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी अविनाश असवले, त्यांचे चुलते ग्रामपंचायत सदस्य भूषण असवले व सहकारी ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून ते लिंबू खिळा मारून झाडाला ठोकले होते.
याबाबत फिर्यादीनंतर तातडीने घटनास्थळी धाव होत घटनेची पाहणी केली. हा जादूटोण्याचा प्रकार टाकवे ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीवरून केल्याचे बोले जात आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशी लेखी तक्रार अविनाश असवले यांनी पोलिसांकडे केली आहे.