…म्हणून शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य; ‘ही’ होती यशवंतराव चव्हाणांची भूमिका 

मुंबई – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नाव द्यावे व त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांना केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने ज्या संस्था असतील त्यांचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण आदरार्थी उल्लेख असावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे.त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, सोशल मीडियावर काहीजण याचे समर्थन तर काही विरोध करत आहेत. यासंदर्भात एका युझरने फेसबूक पोस्टद्वारे शिवाजी विद्यापीठ हे नाव कसे निश्चित झाले यावर सविस्तर लेख लिहिला आहे.

शिवाजी विद्यापीठ स्थापनेवेळच्या दोन उल्लेखनीय घडामोडी…
– उदय धारवाडे
1960 दशकाच्या सुरवातीला दक्षिण महाराष्ट्रात एक नवे प्रादेशिक विद्यापीठ स्थापन व्हावे, त्या विद्यापीठला प्राचार्य डॉ बाळकृष्ण यांचे इच्छेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे असे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळामध्ये ठरले, विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करणेसाठी एक चिकित्सा समिती नेमण्यात आली.

विद्यापीठाच्या नावाबाबत मतभेद-
डॉ बाळकृष्ण यांच्या इच्छेनुसार छत्रपती शिवरायांचे नाव विद्यापीठाला द्यायचे याबाबत कोणाचेही हरकत नव्हती, विद्यापीठाच्या कायद्यासंबधीही मतभेद नव्हते. पण नाव कोणत्या पद्धतीने द्यायचे याबाबत चिकित्सा समिती मध्ये मतभेद होते, समिती मधील काही सदस्यांनी विद्यापीठाचे नाव ‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ ठेवावे असे वाटत होते,या आग्रहमध्ये कोल्हापूरचे पाहिले आमदार बलवंतराव बराले हे पण होते, त्यांनी सतत दोन तीन दिवस हा आग्रह धरून ठेवला त्यांच्या या भूमिकेला समर्पक असे कोणी उत्तर दिले नव्हते, शेवटी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना चेंबर मध्ये बोलावले आणि सांगितले की “तुम्ही असा आग्रह धरू नका कारण बडोद्याचे महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा उल्लेख लोकांच्या तोंडी नेहमी एम एस युनिव्हर्सिटी असाच असतो. तसेच आपल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठकरासी विद्यापीठाचा उल्लेख ही लोक नेहमीच एस एन डी टी विद्यापीठ असाच करतात ‘तसे आपल्या विद्यापीठाचे होऊ नये.’शिवाजी विद्यापीठ’ या नावानेच सतत उल्लेख झाला तर शिवाजी हे नाव लोकांच्या सतत डोळ्यासमोर राहील. शिवाय एवढ्याच नावामुळे आपण दुसर्‍या कोणाच्या नावाने हे विद्यापीठ सुरू करत असे मानण्याचे कारण नाही. या नावामध्ये सुद्धा श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे सूचित होते”

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे हुशार होते त्यांचा हा युक्तिवाद इतका बिनतोड होता की, त्या आग्रही सदस्यांनी एकदम माघार घेऊन त्यांच्या सुचना मान्य केली. कोणत्याही कारणामुळे अशी ही गोष्ट कोणाच्या लक्ष्यात आली नाही, अश्या प्रकारे विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ असे निश्चित करण्यात आले.

अलीकडे काही राजकीय पक्ष आणि संघटना शिवाजी विद्यापीठाचे नावात बदल करावा अशी मागणी करत आहेत पण त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या सुचना, युक्तिवाद लक्षात घ्यावा आणि पुढील काळात शिवरायांचे नाव नजरेआड होईल अशी मागणी करू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.