हद्दीत समावेश होऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळेनात : नागरिकांचे महापौरांना साकडे
अधिकाऱ्यांसमवेत दौरा करून समस्या सोडवणार : महापौर
विश्रांतवाडी – लोहगावचा महापालिकेत समावेश होऊनही अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यात स्वच्छता, पथदिवे या मूलभूत समस्या कायम आहेत. विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते ते विकसित न केल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी भाजप वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष संतोष खांदवे-पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.
पुणे पालिकेत ऑक्टोबर 2017 मध्ये लोहगावसह 11 गावे समाविष्ट करण्यात आली. याला तीन वर्षे उलटून गेली असली तरी या भागात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. लोहगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु लोहगावला होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत कमी असून आठवड्यामध्ये एकदाच व कमी दाबाने पुरवठा होत आहे.
पोरवाल रोड भागामध्ये मोठमोठे निवासी प्रकल्प उभे असून, तेथील लोकसंख्या 30 ते 40 हजारांच्या आसपास आहे. परंतु या लोकसंख्येला अजूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. रहिवासी मिळकतकर नियमितपणे भरतात. परंतु त्यांना सुविधा मिळत नाही.
पोरवाल रस्ता अरुंद असून तेथे वाहनांची वर्दळ असते. या भागात दोन डीपी रस्ते प्रस्तावित आहेत. ही कामे तत्काळ सुरू करावीत, आदी समस्या मांडण्यासाठी संतोष खांदवे-पाटील, नगरसेवक मारुती सांगडे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, विनीत वाजपेयी, रुपेश पवार, अतुल साळवे यांनी महापौरांची भेट घेतली. महापौरांनी नगरअभियंता प्रशांत वाघमारे व इतर अधिकाऱ्यांना बोलावून घेत, या समस्यांबाबत चर्चा केली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लोहगावचा दौरा करून समस्या सोडवण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेना
महानगरपालिकेने दहावी व बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. परंतु, यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना प्रभाग 42 चा उल्लेख नसल्याने लोहगावमधील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येत नाही. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना, तसेच महापालिकेच्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती खांदवे यांनी महापौरांना यावेळी केली.