घरकूल देण्याच्या नावाखाली फसवणूक; चार लाभार्थींना गंडा

सुपा परिसरातील घटना

सुपा: सुपा परिसरात एका भामट्याने घरकूल योजणेतील पात्र लाभार्थींची भेट घेऊन दीड ते तीन हजार रुपये घेऊन, मी तुम्हाला घरकूल मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली आहे. या फसवणुकीचे बळी सुपा येथील चार लाभार्थी तसेच घाणेगाव, गटेवाडीसह तालुक्‍यातील अनेक लाभार्थींना त्याने गंडा घातला आहे.

पारनेर तालुक्‍यातील शबरी योजणेंतर्गत अनेक लाभार्थीं या घरकूल योजणेत पात्र झाले आहेत. तालुक्‍यात एका भामट्याने ही यादी मिळवून त्या लाभार्थींचे आधार कार्डचे झेरॉक्‍सही काढले आहेत. संबंधित लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांना त्यांचे आधार कार्डचे झेरॉक्‍स दाखवून आम्ही सरकारी अधिकारी आहोत, आपणास तत्काळ घरकूल मिळवून देतो, असे सांगून त्याने संबंधितांकडून दीड ते तीन हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. या भामट्याने जाताना आपला मोबाईल क्रमांकही संबंधित लाभार्थीस दिला आहे. या फसवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतमध्ये चौकशी केली असता, आमचा कोणीच किंवा कोणताच सरकारी अधिकारी असा घरी येत नाही, पैसे घेऊन घरकूल मंजूर करीत नसल्याचे सांगितले. यावेळी संबंधित मोबाईलवर संपर्क केला असता, तो थेट गोवा राज्यात लागत आहे.

मात्र या भामट्याने दुसरा क्रमांक देऊन चौकशी करा असे सांगितले. त्याने दिलेल्या मोबाईलवर फोन करून चौकशी केली असता, त्याने आपलीही फसवणूक झाल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याने ज्या माणसाने फसवणूक केली त्याचा फोटोही पाठवला आहे. मात्र फोटोतील व्यक्ती खरोखर भामटा आहे का ही शंका आहे. कारण ज्याने फोटो पाठवला आहे. तोही कदाचित त्या भामट्याचाच साथीदार असण्याची शक्‍यता आहे.
संबंधित भामट्यांनी दारिद्य्र रेषेखालील लोकांची यादी व आधार कार्डच्या झेरॉक्‍स कोठून मिळवल्या हा खरा प्रश्‍न असून अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी फसवणूक झालेल्या सचिन माळी, रंगनाथ पवार व वनाजी माळी यांच्यासह फसवणूक झालेल्यांनी केली आहे.


तालुक्‍यातील विविध गावांत फसवणूक
या पूर्वीही तालुक्‍यात गत महिन्यातच संजय गांधी निराधार योजणेची सहाशे रुपये अनुदान मिळवून देतो, असे सांगून अनेकांना दोन भामट्यांनी पाचशे ते एक हजार रुपये घेऊन गंडा घातला होता. तालुक्‍यातील अनेक गावात अशी फसवणूक केली होती, आता घरकूल योजणेत घरकूल मिळवून देतो, या नावाखाली लाभार्थींची फसवणूक केली जात आहे.


शबरी योजणेतील घरकूल मिळवून देतो, असे सांगून सुपा गावातीलच पावार वस्तीवरील चार लाभार्थींकडून दीड हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. असा कोणताच अधिकारी घरी येऊन घरकूल देऊ शकत नाही. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. घरकूल मिळविण्यासाठी तुम्ही कोणालाच पैसे देऊ नका, तुमची फसवणूक होऊ शकते.
अशोक नागवडे ,ग्रामविस्तार अधिकारी, सुपा.

Leave A Reply

Your email address will not be published.