खासदाराकडून विकासाच्या नावाने थापा – अमोल कोल्हे

चिखली – गेल्या पंधरा वर्षात विकासकामे काय केली? उत्तर काय तर काहीचं नाही. मग, काय थापा मारायच्या आणि जनतेची दिशाभूल करायची. आता, तर या खासदाराने पीएचडी करणार असल्याने नवी थाप मारण्याचा उद्योग सुरु केला आहे. आता, तुम्ही ठरवा अशा खासदारांचे काय करायचे, तर त्यांना घरी बसवायचे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी चक्रपाणी वसाहत येथे केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भागांचा दौरा करुन मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिवर्तनाचा नारा दिला. कोपरा सभेत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पंडीत गवळी, योगेश गवळी व सर्व चक्रपाणी वसाहत येथील रहिवासी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, खासदारांनी संरक्षण खात्याला जे 128 प्रश्‍न गेल्या पंधरा वर्षात विचारले त्यात किती प्रश्‍न हे रेडझोनविषयी होते, तर एकही नाही. मग तीन टर्म त्यांनी काय केले? हे त्यांना आता विचारायचे आहे आणि मतदानातून परिवर्तन करायचे आहे. लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदारसंघातील प्रत्येक भागाचा विकास कसा होईल, तेथील मुख्य समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. प्रत्येक भागाला काय हवे याचा आराखडा माझ्याकडे आहे. या भागात भैरवनाथ विद्यालयात येथील 500 पेक्षा जास्त विद्यार्थी महामार्ग ओलांडत असतात. विद्यार्थ्यांसाठी हायवे क्रॉसिंगची सुविधा खूप आवश्‍यक आहे. खरे तर हे खूप आधीच झाले पाहिजे होते. पण, 15 वर्षे वाया गेली असली तरी माझा शब्द आहे. प्रथम हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, तसाच रेडझोनचा प्रश्‍नही सोडविला जाईल. त्यासाठी आता आपल्याला भाकरी फिरवायची आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून न फिरकलेल्या विद्यमान खासदाराला घरचा रस्ता दाखवायचा आहे, असे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.