नाव स्वाभिमानी आणि धंदे मात्र बेईमानी

रघुनाथ पाटील यांचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शरसंधान

कोल्हापूर, (प्रतिनिधी) – नाव स्वाभिमानी आणि धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्यावतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. गेल्या वीस वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशात वाढल्या आहेत. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने कोणतेही शेतकरी धोरण निश्‍चित झालेले नाही. याच बरोबर साखर कारखानदारांनी यंदाची एफआरपीची किंमत बुडवले आहेत. या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी पंढरपुरात तीन सप्टेंबर रोजी शेतकरी परिषद होत आहे, असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी टीका केली. कडकनाथ अंडी आणि कोंबडी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 325 एकर शेती घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत यांच्या जवळचे नातेवाईक शासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांना लुबाडतात. शेतकऱ्यांचे नेतेच शेतकऱ्यांना लुबाडतात. त्यांच्या संघटनांचे नाव स्वाभिमानी असले तरी धंदे मात्र बेईमानीचे आहेत. असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला.

पुरात शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान शेतकरी नेत्यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुका शेतकरी संघटना समविचारी पक्षांना एकत्र येऊन लढणार आहे, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले. यावेळी माणिक पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.