नेवासा – तिसगाव (ता.पाथर्डी) येथील रहिवासी असलेल्या कल्याण देविदास मरकड या व्यक्तीचा मृतदेह प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात सोमवारी (दि.४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिळून आला.
मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर कपाळावर खोल छिद्र असलेली जखम दिसून आल्याने युवकाचा खून झाल्याचा दाट संशय निर्माण झाला. तिसगाव येथील राहणारा कल्याण मरकड हा १ नोव्हेंबरच्या रात्रीपासून गायब झालेला असून, याबाबत त्याचा भाऊ प्रसाद मरकड याने पाथर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सूचना दिल्या.
प्रवरानदीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याबाबत नागरिकांनी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती दिलेली होती. निरीक्षक जाधव यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठवले होते. मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर कपाळावर खोल छिद्रअसलेली जखम दिसून आल्याने युवकाचा खून झाल्याचा दाट संशय निर्माण झाला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवून ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असता तिसगाव येथील राहणारा कल्याण मरकड हा १ नोव्हेंबरच्या रात्रीपासून गायब झालेला असून, याबाबत त्याचा भाऊ प्रसाद मरकड याने पाथर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद केली आहे.
नेवासा पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांशी तातडीने संपर्क केला. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रथम नेवासा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला परंतु कपाळावर खोल छिद्र असलेली जखम असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला होता.
परंतु सदरची जखम ही एखाद्या अग्नीशस्त्राने केली असावी, असा दाट संशय आल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालय, संभाजीनगर येथे पाठवण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तपासाबाबत सूचना दिल्या.
या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी देखील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत. कल्याण मरकड याचा खून झाल्याबाबत मृतकाचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने रात्री उशीरा फिर्याद दिल्याने पंकज राजेंद्र मगर, ईरशाद जब्बार शेख (दोन्ही रा. तिसगाव) यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.