पुणे – गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिका 100 टन अमोनियम बाय कार्बोनेट खरेदी करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात घरगुती आणि सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला जाते. या उत्सवादरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या सुमारे 5 लाख गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. उत्सवानंतर या मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठ किंवा विसर्जन हौदांचा वापर केला जातो. परंतु, या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती त्वरेने विरघळत नाही आणि त्यातील रासायनिक रंगांमुळेही पाणी प्रदूषित होत असल्याने या मूर्ती विसर्जनाची समस्या आजही कायम आहे.
गणेश मूर्तींचे विसर्जनानंतर सन्मानपूर्वक व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र “प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार संशोधना अंती अमोनियम बाय कार्बोनेटचा प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये या मूर्ती विरघळतात. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळेच 2017 पासून महापालिकेने याबाबत जनजागृती सुरू केली. दरवर्षी साधारण 100 टन अमोनियम बाय कार्बोनेट खरेदी केले जाते.