शहर स्वच्छ-सुंदर करताना पालिकेची दमछाक

पिंपरी-चिंचवडकरांना शिस्त लागेना : कचरा, प्लॅस्टिक, रस्त्यावर घाण करणे सुरुच

पिंपरी  – स्मार्ट सिटी म्हणून उदयाला येत असलेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवताना महापालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील रस्ते, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी त्याला विविध भागातील नागरिकांकडूनच हरताळ फासला जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. शहर घाण करणे, नियम धाब्यावर बसवून प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर करणे, अशा प्रकारांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. गेल्या पाच महिन्यात महापालिकेने अशा 1906 लोकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 18 लाख 5 हजार 70 रुपये दंड वसूल केला आहे. यातील सर्वात मोठा दंड हा प्लॅस्टिक वापर करणाऱ्या 190 जणांवर केला आहे. या लोकांकडून 9 लाख 80 हजाराचा दंड वसूल केला आहे.

राज्यामध्ये औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेले पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट सिटी’ म्हणून नावारुपाला येत आहे. मात्र, स्मार्ट सिटी होत असताना शहरातील स्वच्छता आणि सुंदरता याकडे मात्र कानाडोळा होत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. बेस्ट सिटी म्हणून बक्षीस मिळालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला सध्या पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट तर नाहीच मात्र स्वच्छ आणि सुंदर ठेवतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्याचा दावा महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी विविध भागात झालेली अस्वच्छता यामुळे अनेकदा सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने अस्वच्छता करणे, रस्त्यावर घाण करणे, सर्वाजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी राडा-रोडा टाकणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे, कचरा जाळणे, बायोमेडीकल वेस्टचा निचरा न करणे, डासोत्पत्तीची ठिकाणी आढळणे व बंदी असताना प्लॅस्टिक बाळगणाऱ्या लोकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असते. मागील पाच महिन्यात या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2019 ते ऑगष्ट 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीत अशा 1 हजार 906 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 18 लाख 5 हजार 70 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली असतानाही शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यावर घाण, तसेच कचरा करणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. एकीकडे शहर “स्मार्ट सिटी’ करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना शहरातील रस्त्यांवर होणारा कचरा, दुर्गंधी त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय बनला आहे. महापालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याचे कारण नागरिकांतून देण्यात येत असले तरी “स्वच्छ आणि सुंदर’ शहर बनवण्यासाठी महापालिकेला आणखी नव्या उपाययोजना कराव्या लागणार हे मात्र निश्‍चित आहे.

सहा रुग्णालयांवर कारवाई
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असणारे वैद्यकीय कचऱ्याची योग्य रित्या विल्हेवाट लावण्याच्या सूचना सर्वच दवाखान्यांना देण्यात आल्या आहेत. असे असताना काही रुग्णालयांकडून वैद्यकीय कचरा उघड्यावर रस्त्यावर तसेच कचराकुंडीमध्ये टाकण्यात येत आहे. मागील सहा महिन्यात शहरातील अशा 6 रुग्णालयांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)