उद्योगनगरीचा नावलौकिक वाढविणाऱ्या
क्रीडादिनानिमित्त आयोजन : विद्यार्थी खेळाडूंचाही होणार सत्कार
पिंपरी – क्रीडा क्षेत्रातील उच्चतम पद्मश्री, खेलरत्न, अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करून उद्योगनगरीचा नावलौकिक वाढविणाऱ्या विविध क्रीडापटूंसह शहरातील खेळाडूंचा क्रीडा दिनी महापालिकेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. येत्या गुरूवारी (दि. 29) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, नगरसेवक राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीनेही हा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने महापालिका क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचाविणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न, अर्जून, शिवछत्रपती अशा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पॅरालॉम्पिक जलतरण स्पर्धेचे विश्वविजेते, निवृत्त नाईक सुभेदार मुरलीकांत राजाराम पेटकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय बॉक्सर व अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग यांचा समावेश आहे.
तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर विजय यादव, मैदानी खेळाडू स्नेहल खैरे, पैलवान मारूती आडकर, कबड्डीपट्टू शितल मारणे, पूजा शेलार, संगीता सोनवणे, नितीन घुले, राजू घुले, शंकर काटे, ट्रायथॅलॉनमधील खेळाडू सोनाली लोणारी, सायकलपट्टू प्रतिमा लोणारी, मिनाक्षी शिंदे, दीपाली पाटील, मिलिंद झोडगे, प्रशांत झेंडे, कमलाकर झेंडे, गिर्यारोहक राजेश पाताडे, बुद्धीबळपट्टू स्वाती घाटे, शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांना देखील गौरविण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांचा गौरव सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शहरातील 144 विद्यार्थी खेळाडूंना सन 2017-18च्या क्रीडा शिष्यवृत्तीचे धनादेश देखील वाटप करण्यात येणार आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांचाही सन्मान
क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती पदक प्राप्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, राजाराम पाटील, गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचा सन्मानही क्रीडा दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात करण्यात येणार आहे.