तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा बनवण्यासाठी तंत्रज्ञ, तज्ज्ञांची घेणार मदत
पुणे – तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा बनवण्यासाठी पुणे महापालिकेने “महामेट्रो’कडे सहकार्य मागितले आहे. तसे पत्रही प्रकल्प विभागाने महामेट्रोला दिले आहे. महापालिकेकडे असलेल्या तज्ज्ञ सल्लागारांमध्ये बोगदा बनवणाऱ्या तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांचा समावेश नाही. महामेट्रोकडे तसे तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ असल्याने त्यांनी महामेट्रोकडे मदत मागितली आहे.
महापालिकेतील प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी तसे पत्र महामेट्रोला पाठवले आहे. शहराची वाढता विस्तार, वाढते औद्योगिकरण, आयटी हब आणि नागरिकरण यामुळे शहराची लोकसंख्या आणि वाहनांचीही संख्या वाढत आहे. वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तळजाई परिसरातून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी थेट रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रज मार्गाने जावे लागते. त्यामुळे या दोन रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा बनवून वरील दोन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे. त्यासाठी या रस्त्याचा आराखडा महापालिका प्रशासनाने बनवला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने 11 डिसेंबर 2012 मध्ये हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यामध्ये सल्लागारांच्या पॅनलला मंजुरी देण्याचाही उल्लेख होता. मात्र, या पॅनलमध्ये बोगद्यासंबंधिचे विशेषज्ञ किंवा तंत्रज्ञांचा समावेश नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम करणे अवघड आहे. हाच बोगदा बनवण्याचे काम सध्या महामेट्रोतर्फे केले जात आहे. तसेच या रस्त्याचेही काम व्हावे यासाठी महामेट्रोचे तज्ज्ञांची मदत व्हावी आणि त्यांनी तो डीपीआर बनवावा, असे या पत्रात नमूद केले आहे.
बोगद्याच्या कामासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद
महापालिकेच्या उर्वरित विकास आराखड्यास राज्य शासनाने फेब्रुवारी 2018 मध्ये मंजुरी दिली. या विकास आराखड्यात तळजाई टेकडी ते सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या प्रस्तावित बोगद्याचा समावेश होता. या बोगद्याच्या कामासाठी महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या तांत्रिक गोष्टींची तपासणीसाठी आणि प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तीनवेळा जाहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, कोणत्याही सल्लागार कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता महापालिकेने महामेट्रोला पत्र पाठवून डीपीआर बनवण्याची तसेच सल्लागार नेमण्यासाठी मदत मागितली आहे, असे महापालिकेतील मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.