नगरपालिकेचा कारभार थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून

गोरेंच्या कामकाजावर चौकशीचे प्रश्‍नचिन्ह – प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना पालिकेत यायला नाही वेळ

2012 मध्ये दिवंगत मुख्याधिकारी तुळशीदास लवंगारे यांच्या रजेवर जाण्याने तत्कालीन प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी दोन वेळा पालिका मुख्याधिकारी पदाचा भार सांभाळला होता. त्यानंतर बापट हे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून हजर झाले. तशीच अवस्था पुन्हा निर्माण झाली आहे. गोरेंच्या येण्याची खात्री नसल्याने रवी पवार यांच्यावरच कामाचा भार आहे. डीएमए कार्यालयाकडून काही बदल्या मिळतीलही, पण साताऱ्याला मुख्याधिकारी मिळताना प्रचंड अडचणी निर्माण होतात हे सत्र अजूनही थांबलेले नाही.

सातारा – मुख्याधिकारी शंकरराव गोरे पंधरा दिवसांच्या रजेवर गेल्याने प्रभारी चार्ज जिल्हा प्रकल्प संचालक रवी पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून पालिकेचा कारभार सुरू आहे. महत्त्वाच्या प्रस्तावावर मुख्याधिकाऱ्यांच्या सह्या घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे विषय पालिकेचा आणि बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात असे चित्र पाहावयास मिळत आहे.

भुयारी गटार योजनेवेळी आधी मुख्य अभियंता सक्‍तीच्या रजेवर गेले. त्यानंतर या योजनेवर संशयाचे ढग जमल्याने प्रकृती अस्वास्थाचे कारण देऊन मुख्याधिकारी शंकरराव गोरे रजेवर गेले. आता ते परतणारच नाही आणि परतले तरी ते काही दिवसांचे पाहुणे असतील, गोरे साहेबांच्या बदलीची मंत्रालयातून तजवीज झाल्याची खसखस साताऱ्यापासून मुंबईपर्यंत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सातारा पालिकेत सभापती बदलांचे जोरदार वारे वाहत आहेत.

याशिवाय घनकचरा प्रकल्प, भुयारी गटार योजना, ग्रेड सेपरेटर या योजनांच्या समन्वयीकरणाची मुख्य जवाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर आहे. याशिवाय वेतन आयोगाची अंमलबजावणी, चतुर्थ वार्षिक पाहणीची सुरुवात, जीआयएस मॅपिंगसाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा, भिक्षेकरी गृहाजवळ सांडपाणी प्रकल्प केंद्रासाठी सहा गुंठे जमिनीची मागणी यासारखे बरेच महत्त्वाचे विषय प्रलंबित ठेवून शंकरराव गोरे अचानक रजेवर गेल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. किरकोळ रजा नामंजूर झाल्याने थेट मणका दुखीचे कारण पुढे आले. आता हा रजा कालावधी थेट मेडिकल बोर्डकडे जाण्याची चिन्हे आहेत.

गोरेंची गैरहजेरी आणि रवी पवारांची व्यस्तता यामुळे पालिका प्रशासनाचे ताळतंत्र सुटले आहे. 23 मे रोजी जाहीर झालेला लोकसभा निवडणुकांचा निकाल, त्यानंतर आचारसंहितेनंतर प्रशासकीय कामे संपवण्याची गडबड, लोकशाही दिनापासून जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवड या सारख्या कामांच्या व्यस्ततेमुळे रवी पवार सातारा पालिकेच्या वाट्याला येईनासे झाले आहेत. त्यामुळे लेखा, बांधकाम, नियोजन, बांधकाम परवाने इतर प्रस्तावासंदर्भातील बैठका रवी पवार यांच्या दालनातच पार पडत आहेत.

अगदी पर्यावरण गणेशोत्सवाच्या बैठकीला येताना पवारांना अनेक बैठकीचे दिव्य पार पाडावे लागले होते. शंकरराव गोरे गुरुवारी दि. 6 रोजी हजर होणार असल्याची चर्चा होती. ओंकार तपासे यांच्या दक्ष तक्रारीमुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका आहे. मात्र त्यातही काहीच चौकशी झाली नाही. गोरेंची चौकशी प्रांत सातारा करणार आहेत. जरी गोरे हजर झाले तरी बराचसा वेळ कामापेक्षा चौकशीची शुक्‍लकाष्ठ निस्तरण्यातच जाणार आहे. तसेही गोरेंची तीन वर्षांची मुदत संपल्याने ते पुन्हा निघण्याच्या तयारीनेच येणार असल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.