मुंबईहून आलेली महिला घरी न जाता थेट रुग्णालयात दाखल
पिंपरी(प्रतिनिधी) – काकडे पार्क, चिंचवडगाव येथे एक करोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती सोमवारी (दि. 25) महापालिकेने दिली होती. मात्र तो रुग्ण मुंबईहून आला असून घरी न येता थेट थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्या रुग्णाचा चिंचवडगावाशी संपर्क आलेला नाही. यामुळे हा परिसरत अद्याप सील केला नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात करोना बाधित आढळून येत आहेत. मात्र प्राधिकरण आणि चिंचवडगाव परिसरात करोनाने अद्याप शिरकाव केलेला नाही. सोमवारी काकडे पार्क, चिंचवड या भागात करोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेने प्रसिद्धीस दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता रुग्ण महिला मुंबईहून आल्या होत्या. परंतु आपल्या मुलाच्या घरी न जाता त्या थेट थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. तिथे केलेल्या तपासणीमध्ये त्या करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा मुलगा काकडे पार्कमध्ये राहण्यास असल्याने प्रथम त्या चिंचवडमधील रुग्ण असल्याची माहिती महापालिकेने दिली होती.
रुग्ण महिलेने सावधानी बाळगल्याने आणि काकडे पार्क चिंचवड येथे न येता थेट रुग्णालयातच दाखल झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यामुळे काकडे पार्कचा परिसर सील न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णाचा मुलगा, सून आणि त्यांचा मुलगा यांना महापालिकेने घरात अलगीकरण करण्यास सांगितले आहे. मात्र येथील व्यापाऱ्यांनी स्वतःहून मंगळवारी (दि. 26) दुकाने बंद ठेवली होती.
यापूर्वी माणिक कॉलनी परिसरात पुण्यातील गंज पेठेतून आलेल्या एकास करोनाची लागण झाली होती. यामुळे करोनाने चिंचवडगावात शिरकाव केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र चौकशीअंती हा रुग्णही अवघे चारच तास चिंचवडच्या माणिक कॉलनीत असल्याचे समजले. म्हणून या भागात सर्व्हेक्षण करीत महापालिकेने निर्जंतुकीकरण केले होते. या दोन्ही घटनांनंतर चिंचवडगावात अद्याप करोनाचा शिरकाव झाला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याने चिंचवडकरांनी आनंद व्यक्त करीत सुटकेचा निःश्वास सोडला आहे.