माजी आयुक्त झगडे यांची टीका
पुणे – अंदाजपत्रकात शहरावर अन्याय झाला आहे. प्रत्यक्षात समस्या लक्षात घेऊन सुविधा देणे अपेक्षित असताना, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचे अंदाजपत्रक फुगवण्यात आले असून, ते अवास्त्व असल्याची टीका महापालिकेचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी केली.
सजग नागरिक मंचाने “महापालिकेच्या प्रस्तावित अंदाजपत्रकाचे विश्लेषण’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी झगडे बोलत होते. ते म्हणाले, “आयुक्तांनी मांडलेले अंदाजपत्रक पुणेकरांच्या अपेक्षाभंग करणारे आहे. प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च पाहता ते वास्तवादी असणे आवश्यक आहे. मात्र, यात उत्पन्न अथवा खर्चाचे नियोजन नाही. अर्थसंकल्पातील अनेक कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना ती अपूर्ण ठेवली जात आहेत. त्यामुळे केवळ पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय करण्याचा घाट घालण्यात आला आहे. वाहतूक, पाणी, आरोग्य, झोपडपट्टी प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबत यात काहीच नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन साक्षर आहे का? असे अनेक प्रश्न झगडे यांनी यावेळी उपस्थित केले.
पुरस्कार म्हणजे मानसिक आजार
शहराला पुरस्कार मिळतात म्हणजे, शहरात सगळे चांगले आहे. कोणत्याही समस्या नाहीत असा प्रशासनाचा समज आहे. त्यामुळे, महापालिकेला पुरस्कार मिळणे म्हणजे मानसिक आजार, पुरस्कार वशिल्याने मिळविले जातात. गेल्या काही वर्षात पालिकेस वेगवेगळे पुरस्कार मिळाल्याने प्रशासन पुरस्कार मिळवण्यासाठीच काम करते का काय, असे चित्र असल्याचेही ते म्हणाले.