तिला उद्योजिका म्हणावं, मेकॅनिक म्हणावं, समाजसेविका म्हणावं, पर्यावरणवादी म्हणावं, आंदोलक म्हणावं की नेता म्हणावं? तिचे कार्य पाहून ही सर्वच विशेषणे तिला आपण नक्की देऊ शकू… कारण दुर्गा भोर या उच्चशिक्षित तरुणीची ही धडाडीच म्हणावी लागेल, ज्यामुळे कमी वयात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती या विविध भूमिका उत्तमरीत्या बजावत आहे. एमआयडीसीमधील आपला व्यवसाय सांभाळत महिला उद्योजिकांना मदत करणे, वृक्षलागवड व संवर्धन करणे, झोपडपट्टीतील मुलांसाठी क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न करणे, महिला कामगारांच्या समस्या सोडविणे, मोर्चा-आंदोलनात सहभाग घेणे अशा वेगवेगळ्या स्तरातील कामे दुर्गा लीलया पार पाडते. तिच्या रूपाने जणू देवी दुर्गाच अनेक हातांनी अनेक कामे करीत असते. तिची ही अनोखी कथा आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरक ठरणारी आहे.
आजोबा आणि वडिलांकडून आलेला समाजसेवेचा वसा डोळ्यासमोर ठेवून दुर्गा आपला व्यवसाय सांभाळत महिलांना उद्योगक्षेत्रांमध्ये आणण्यासाठी व त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी धडपड करत आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योगनगरीत काम करताना आपला स्वत:चा व्यवसाय सांभाळत शहरातील तसेच परिसरातील गरजू व होतकरू महिलांना उद्योग उभारणीसाठी तसेच एमआयडीसीमधील महिला कामगारांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी धडपड करीत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे माजी नगरसेवक तथा मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सोपानराव भोर हे दुर्गाचे आजोबा. तर फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष तथा छावा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अभय भोर हे दुर्गा भोर हिचे वडील. त्यामुळे दुर्गाला बालवयापासूनच समाजसेवेचे धडे मिळाले आहेत. दुर्गा हिने अजोबा आणि वडिलांच्या उद्योग व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा व अनुभवाचा उपयोग करत महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना फी दरवाढ, खासगी क्लास चालकाकडून आकारण्यात येणारी भरमसाठ फी अशा अनेक प्रश्नांसंबंधी प्रशासनाला जाब विचारण्याचे काम तीने केले. बीबीएचे शिक्षण घेत असतानाच आपल्या वडीलांना ती व्यवसायामध्ये मदत करीत होती.
वडिलांना व्यवसायात मदत केल्याने उद्योगक्षेत्राची थोडीफार माहिती तिला झाली होती. त्यामुळे तिने नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय निवडताना तिने ऑटोमोबाईल क्षेत्र निवडले. या क्षेत्रातील इत्यंभूत माहिती व्हावी यासाठी दुर्गा हिने स्वतः दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीचे काम शिकून घेतले. दुचाकी दुरुस्तीचे काम शिकल्यानंतर व या क्षेत्रातील माहिती मिळवल्यानंतर भोसरी येथे अवंत ऑटो केअर सर्व्हिसेस’ या दुचाकी रिपेरिंग व्यवसायाची सुरुवात केली. दुचाकी दुरुस्तीच्या व्यवसायात दुर्गाच्या रुपाने पहिल्यांदाच एक महिला या व्यवसायात उतरल्याचे दिसून आले. सध्या तिच्या सर्व्हिंसिंग सेंटरमध्ये आठ लोक कार्यरत आहेत. मात्र पुढील काळात महिलांना दुचाकी व चारचाकी दुरुस्तीच्या व्यवसायात आणणार असल्याचे ती बोलून दाखवते. महिलांनी या व्यवसायाकडे वळावे यासाठी महिलांना दुचाकी व चारचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा मानसही तिने व्यक्त केला. महिलाही पुरुषांबरोबरच प्रत्येक व्यवसायात अग्रेसर ठरू शकतात असे तिचे ठाम मत आहे.
दुर्गाचे वडील अभय भोर हे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष असल्यामुळे लघु उद्योजकांच्या समस्या तसेच एमआयडीसीमधील महिला कामगारांना येणाऱ्या अडचणी याची पुरेपूर जाणीव दुर्गाला होती. त्यामुळे तिने आपला व्यवसाय सांभाळत एमआयडीसीमधील कामगार महिला कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. एमआयडीसीमध्ये महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी भयमुक्त एमआयडीसी” या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला. दुर्गाच्या प्रयत्नामुळे सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसीमध्ये महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे दामिनी पथक गस्त घालत आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच महाराष्ट्रातील एकाही एमआयडीसीमध्ये महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर दुर्गा आता एमआयडीसीमध्ये महिलांसाठी शौचालय उभारले जावे यासाठी प्रयत्न करत आहे.
महिलांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे यासाठी ती नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यामुळेच गरजू महिलांना नवीन उद्योग उभारणीसाठी दुर्गा मदत तर करतेच, शिवाय उद्योगक्षेत्रांमध्ये महिला उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी यांची भेट घेऊन तिने त्यांच्यापर्यंत या समस्या मांडल्या आहेत. यासोबतच गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते. नवीन महिला उद्योजकांना मुद्रा लोन घेण्यासाठी मदत असो किंवा विधवा महिलांना पेन्शन मिळवून देण्यासाठी दुर्गा ही सतत अग्रेसर असते. तिच्या या कार्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक गरजू महिलांना उपयोग झाला आहे.
पुढील काळात दुर्गा झोपडपट्टीवासीय मुलांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. झोपडपट्टी परिसरातील मुलांना क्रीडांगण नसल्यामुळे त्यांच्यातील सुप्त गुण विकसित होऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा मुलांना क्रीडा ऍकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुर्गाने सांगितले. सामाजिक कार्य करीत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचेही महत्त्व ती जाणते. वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ही बाब ओळखून दुर्गा भोर हिने जून महिन्यात 31 हजार वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. महिला सहकाऱ्यांना सोबत घेऊन तिने एमआयडीसी परिसरात हजारो वृक्षांची लागवड केली आहे. केवळ लागवड करून सोडून न देता ही झाडे जगवलीदेखील आहेत. उद्योगक्षेत्रात काम करीत असताना दुर्गाने छावा संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक चळवळींमध्ये सहभाग नोंदवला आहे. सध्या दुर्गाकडे छावा संघटनेचे पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्षपद आहे. या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी ती सोडवत आहे. शिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी विविध आंदोलनात तसेच मराठा क्रांतीमोर्चातही तिने सहभाग घेतला आहे.