एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांचा कल ‘महापरीक्षा’ बंदच करा

पुणे – “महापरीक्षा’ संकेतस्थळातील केवळ त्रुटी दूर न करता ते कायमचे बंद करावे, राज्यसेवेतील सी-सॅट विषय केवळ पात्रतेसाठीच असावा, संयुक्त परीक्षा विभक्त करावी, असा कल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांनी नोंदवला आहे.

एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌सने घेतलेल्या ऑनलाइन मतदानातून हा निष्कर्ष समोर आला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही एमपीएससी उमेदवारांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या समस्यांबाबत ऑनलाइन मतदान घेण्याची अनोखी शक्कल त्यांनी लढवली. त्यानुसार दि. 5 ते 10 जानेवारीदरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले. त्यात संयुक्त परीक्षा विभक्त करावी का, सी-सॅट विषय केवळ पात्रतेसाठीच असावा का, महापरीक्षा संकेतस्थळ कायमचे बंद करावे का असे प्रश्‍न विचारण्यात आले होते. या ऑनलाइन मतदानात राज्यभरातील 44 हजार 477 अधिक उमेदवारांनी सहभागी होत प्रतिसाद नोंदवला.

एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌सच्या फेसबुक आणि यूट्यूबवर हा प्रतिसाद नोंदवण्यात आला. या ऑनलाइन मतदानातून समोर आलेल्या निष्कर्षाचा अहवाल तयार करून आयोगाला आणि शासनाला सादर करण्यात येत आहे. त्यानंतर तरी या मागण्यांबाबत कार्यवाहीची अपेक्षा आहे, असे एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌सच्या किरण निंभोरे, महेश बडे यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या महापरीक्षा पोर्टलबाबत उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी हा विषय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील उचलून धरला. त्यावर पोर्टलमध्ये आवश्‍यक तांत्रिक सुधारणा करण्यासह विविध आश्‍वासने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, त्यानंतरही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे या उमेदवारांनी आता कल घेतला असून त्यावर शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.