मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनातून विखे पाटलांवर जोरदार टीका करण्यात आली. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, असे शाब्दिक फटकारे सामनाच्या अग्रलेखातून ओढण्यात आले आहेत.
विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, ”एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.” यावर शांत बसतील ते थोरात कसले!
थोरातांनीही सांगितले की, ”मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे, असा सल्ला देखील विखेंना सामनातून देण्यात आला.
विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्या माशांचे प्रतिनिधी असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.