पाथर्डीत मनसेचे ठिय्या आंदोलन

सिंगल फेजचे काम सुरू करण्याची मागणी
पाथर्डी  – शिरसाटवाडी येथील अपूर्ण सिंगलफेज लाइटचे काम त्वरित सुरु करावे या प्रमुख मागणीसाठी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तालुक्‍यातील शिरसाटवाडी येथील मुंजोबा नगर, पडकाचा मळा, शेकडे वस्ती, घुले, ढाकणे वस्ती, खंडोबा माळ, महादेव मळा येथील सिंगलफेजच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदोलने, पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच याच मागणीसाठी 5 फेब्रुवारी रोजी शिरसाटवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलनही केले होते.

यावेळी वरील सर्व भागातील सिंगलफेजचे काम 1 महिन्यात पूर्ण करू असे आश्‍वासन तहसीलदार यांच्यासमोर दिले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त महादेव मळा या एकाच ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अविनाश पालवे यांनी उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे व सहायक अभियंता वैभव सिंग यांच्यासह अहमदनगर येथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आपण दिलेल्या आश्‍वासनाचे काय झाले? आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये? आम्ही अजून किती आंदोलने करायची? असा जाब विचारला.

पालवे चांगलेच आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. निलेश मोरे यांनी नगर येथील कार्यकारी अभियंता मनिष सूर्यवंशी यांच्याशी फोनवरून पालवे यांचे संभाषण करून दिले त्याप्रमाणे सूर्यवंशी यांनी मुंजोबा नगर, पडकाचा मळा, शेकडे वस्ती, घुले ढाकणे वस्ती, खंडोबा माळ या उर्वरित भागाचे सिंगलफेजचे काम एक महिन्यात सुरु करू असे सांगितले व तसे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अशोक ढाकणे, अशोक फुंदे, तुषार शिरसाट, अंबादास शिरसाट, रामनाथ शिरसाट, नितीन शिरसाट, बाबू शिरसाट, योगेश शिरसाट, सोमनाथ कुटे, सोमनाथ शिरसाट, अरविंद्र राठोड, संतोष राठोड, संकेत भाबड, लहू शिरसाट, जालिंदर बांगर यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.