पाचगणी – काटवली (ता. जावळी) येथे पाचगणी-पाचवड मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून पावसाचा जोर कायम राहिल्यास डोंगराचा काही भाग या मार्गावर येणार आहे तर त्याखाली असणाऱ्या दोन घराना धोका निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पाचगणी-पाचवड मुख्य रस्त्याला लागून शिंदेवाडी आणि काटवली गावच्या मध्य हद्दीत मुसळधार पावसाने डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने डोंगराचा काही भाग निसटू लागला आहे.
त्यातील रस्त्याला लागून असणाऱ्या दरडीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. त्याला लागूनच या भेगा असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला असून या पडलेल्या भेगा दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत महसूल विभागाने दक्षता घेऊन या भागाची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डोंगररांगाच्या दरडी मुसळधार पावसाने धोकादायक ठरत असून याच ठिकाणांवर एक दरड अर्ध्या रस्त्यात आली असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही दरड तीन दिवसांपासून आहे तशीच आहे. यामुळे गटर बंद झाल्याने सर्व पाणी रस्त्यावरून दीड ते दोन किलोमीटर प्रवास करीत आहे. त्यामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे.