मुंबई – बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते ‘इरफान खान’ यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याचे वृत्त त्याच्या चाहत्यांना व सहकलाकारांच्या मनाला चटका लावून गेले आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच इरफान खानची आई ‘सईदा बेगम’ यांच्या निधनाचे वृत्त समोर आले होते. त्या 80 वर्षांच्या होत्या आणि लॉकडाउनमुळे त्यांच्या अंत्यदर्शनाला इरफान यांना जाता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले. त्यांची आई अनेक दिवसांपासून आजारी होती. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जयपुरच्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
अतिशय हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असणाऱ्या इरफान खान यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी अशाविविध क्षेत्रातील सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सुप्रिया सुळे, संबित पात्रा, अरविंद केजरीवाल, फरहान अख्तर यांच्यासहित अनेकांनी इरफान खान यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करत ट्विट केले आहे.