कोवळ्या हातांनी उतरविला आईचा मृतदेह

पिंपरी – ज्या आईने हसत-हसत मुलांना शाळेत पाठविले, घरी आल्यावर त्याच आईला फासावर लटकताना पाहून मुलांनी “मम्मी तू अस का केल,’ अस म्हणत हंबरडा फोडला. त्या कोवळ्या हातांनी आईचा मृतदेह खाली उतरविला. ही घटना नेहरूनगर येथे गुरुवारी (दि. 13) दुपारी घडली.

चिंता दीपक सिंग (30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. चिंता यांना करण (वय 14) आणि ऋषी (वय 12) ही दोन मुले आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता चिंता यांनी मुलांना शाळेत पाठविले. दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास दोन्ही मुले शाळेतून घरी आली. त्यांनी बेल वाजवूनही मम्मीने दरवाजा उघडला नाही. यामुळे ऋषी याने खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी काढली. घरात प्रवेश केल्यावर त्या दोघांना आपल्या आईचा मृतदेह छताच्या हुकाला लटकलेला दिसला. करणने आईला खालून उचलून धरले तर ऋषीने हुकाची दोरी सोडली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

चिंता यांचा पती हा इंजिनिअर आहे. बुधवारी सकाळपासून दीपक दारू पित होता. गुरुवारीही त्याने दारू पिण्यासाठी घरी आणली. 24 तास दारू पिताय आता तरी बंद करा, असे म्हणत चिंता यांनी दारू पिण्यास दीपक याला मनाई केली. मात्र पत्नीला ढकलून देत शेजाऱ्यांकडून पाणी घेत दीपकने दारू पिणे सुरूच ठेवले. दारू प्यायल्यावर अकरा वाजताच्या सुमारास तो घराबाहेर गेला. दरम्यानच्या काळात चिंता यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी चिंता यांनी आपली नणंद पूनम यांना फोन करून आपल्याला गावचे तिकीट काढून देण्याची मागणी केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी दीपक याला शोधून पोलीस ठाण्यात आणले. मात्र तरीही तो शुद्धीत नव्हता. पत्नीच्या आत्महत्येची चाहूल लागल्यावर चिंता मर गई क्‍या, असे तो विचारत होता.

मुलाच्या वाढदिवसाचे सुरू होते नियोजन
करण याचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा याबाबत सिंग कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच चिंता यांनी गळफास घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here