मुलीने आईच्या विरोधात दिली पोलिसांत फिर्याद
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील एका मुलीने काही दिवसांपूर्वी आईच्या इच्छेविरोधात आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे नाराज झालेल्या आईने मुलीच्या घरी अचानक जावून विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या बाबतची अधिक माहिती अशी की पुणे येथील एका खाजगी कंपनीत ही मुलगी नोकरीस आहे. तेथेच तिची एका मुलाशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलाच्या घरच्यांनी या दोघांना लग्नाची सहमती दिली.
मात्र आई व मामांनी लग्नाला विरोध केल्याने अखेर त्यांच्या मर्जी विरोधात या मुलीने पुणे येथे लग्न केले. हा मुलगा मुळगाव कोपरगाव तालुक्यातील दहेगाव असल्याने ते काही दिवसांसाठी सुट्टीवर आले. 25 डिसेंबर रोजी मुलीच्या आईने अचानक तिच्या घरी येत वादविवाद करीत माझ्या मनाविरुद्ध लग्न का केले, म्हणून रागाच्या भारात विषारी औषध प्राशन करून मुलीच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपल्या आईच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.